परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाला २० वर्षांत केवळ साडेतीनशे कोटी निधी मिळाला. मात्र, यंदा रेल्वे अर्थसंकल्पात १४१ कोटींची तरतूद करण्यात आली. राज्य सरकारचा तितकाच निधी मिळणार असल्याने या वर्षांसाठी २८२ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. दरम्यान, सत्तांतरानंतर ४ महिन्यांत मुंडे भगिनींनी विविध कामांसाठी तब्बल पाचशे कोटी निधी आणला.
बीडच्या परळी-नगर या बहुचíचत मंजूर रेल्वेमार्गासाठी २० वर्षांमध्ये केवळ साडेतीनशे कोटी निधी मिळाल्याने भूसंपादन व नगरकडून काही काम झाले. दरवर्षी रेल्वे अंदाजपत्रकाच्या पाश्र्वभूमीवर आंदोलने होतात. मात्र, निधी मिळत नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सत्तेत आल्यानंतर हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. त्यांच्या पश्चात पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत सरकारच्या धोरणानुसार नवीन मार्गासाठी तरतूद नसल्याचेच चित्र होते. मात्र, प्रत्यक्षात यंदाच्या अंदाजपत्रकात या मार्गासाठी १४१ कोटींची तरतूद करण्यात आली.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार केंद्राबरोबर राज्याचाही निधी मिळणार असल्याने पुढील आíथक वर्षांत या मार्गासाठी तब्बल २८२ कोटी उपलब्ध होणार आहेत. साहजिकच या रेल्वेमार्गाच्या कामांना गती मिळण्याची आशा वाढली आहे. पालकमंत्री मुंडे यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गतही १३२ कोटी, तर जलसंधारण कामासाठी जवळपास १५ कोटी निधी उपलब्ध करून दिला. सत्तांतरानंतर ४ महिन्यात मुंडे भगिनींनी जिल्ह्यातील रेल्वेमार्ग, रस्ते बांधणी, जलसंधारणासह विविध विकासकामांसाठी तब्बल ५०० कोटी निधी खेचून आणला. रेल्वेमार्गासाठी पहिल्यांदाच समाधानकारक तरतूद झाल्यामुळे दिवंगत मुंडे यांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पहिले पाऊल पडले असल्याची भावना खासदार डॉ. मुंडे यांनी व्यक्त केली.