सोलापूर शहरातील निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर बुधवारी सकाळी महापालिकेत महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी आयोजिलेल्या बैठकीत पाणीटंचाईला प्रशासनाला जबाबदार धरत लोकप्रतिनिधींनी बरेच तोंडसुख घेतले. दरम्यान, सोलापूर शहरासाठी गेल्या १७ मे रोजी उजनी धरणातून सोडलेले पाणी येत्या चार दिवसात टाकळी-औज बंधाऱ्यात पोहोचल्यानंतरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत म्हणजे तीन दिवसाआड होऊ शकेल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळी महापौर प्रा. आबुटे यांनी आपल्या दालनात लोकप्रतिनिधी व अधिका-यांची संयुक्त बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर प्रवीण डोंगरे, स्थायी समितीचे सभापती पद्माकर ऊर्फ नाना काळे, पालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी यांच्यासह माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया, मनोहर सपाटे, आरीफ शेख, चेतन नरोटे, विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी, राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे आदींची उपस्थिती होती. पालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी पाणीटंचाईवर प्रकाश टाकत शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा १९६४ सालापासूनचा पूर्वेतिहास सांगितला. पाणी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाची बाजूही त्यांनी मांडली. हिप्परगा तलावातून होणारा पाण्याचा उपसा जवळपास बंद झाला असून टाकळी-औज बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आल्यामुळे उजनी धरणातून गेल्या १७ मे रोजी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी बंधाऱ्यात पोहोचण्यास वेळ लागत आहे. हे पाणी येत्या २४ मे रोजी बंधाऱ्यात पोहोचेल. त्यानंतर २५ मे पासून शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआड प्रमाणे सुरळीत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तोपर्यंत शहराचा पाणीपुरवठा चार ते पाच दिवसाआड करणे अपरिहार्य असल्याचे आयुक्त काळम-पाटील यांनी नमूद केले.
सध्या शहरात पाच दिवसाआड नव्हे तर सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने बेपर्वाई न करता टाकळी बंधाऱ्यातील पाणीसाठय़ावर लक्ष केंद्रित केले असते, तर शहरात पाणीटंचाई निर्माण झाली नसती. पाण्याचे योग्य नियोजन करता येणे शक्य होते, अशी टीका अ‍ॅड. बेरिया व सपाटे यांनी केली. उजनी धरणात पाण्याचा साठा मुबलक असतानासुध्दा शहराला पाणीटंचाईला सामोरे जाणे ही बाब भूषणावह नसल्याची प्रतिक्रिया सभागृहनेते हेमगड्डी यांनी व्यक्त केली, तर महापौर प्रा. आबुटे यांनी पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाने संवेदनशील राहण्याची अपेक्षा व्यक्त करीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, सायंकाळी बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर पाणीटंचाईच्या प्रश्नावर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिका प्रवेशद्वारासमोर मडकीही फोडण्यात आली. पाणी टंचाईच्या प्रश्नावर सत्ताधारी काँग्रेस आघाडीच जबाबदार असल्याचा आरोप चंदनशिवे यांनी केला.