मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात भाजपसाठी एकाच दिवसात पाच सभा घेऊन उमेदवार कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला. काँग्रेसने सर्वापेक्षा सरस नियोजन केले असले, तरी या पक्षाची सारी धुरा खासदार अशोक चव्हाण यांना सांभाळावी लागत आहे. राष्ट्रवादीसाठी आमदार धनंजय मुंडे येऊन गेले, अजित पवार उद्यापरवा येणार आहेत.

लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेचा स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघ या साऱ्या निवडणुका जिंकल्याच्या पाश्र्वभूमीवर नांदेड जिल्ह्य़ातील ११ नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे चव्हाण यांना आव्हान देण्याकरिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे सारेच टपलेले आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला असताना अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये निवडून आले. विधानसभेत जिल्ह्य़ात तीन आमदार काँग्रेसचे निवडून आले. अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात चव्हाण विरुद्ध सारे, असा सामना रंगला होता. पण चव्हाण यांनीच साऱ्या विरोधकांना चितपट करून बाजी मारली. नगरपालिका निवडणुकांमध्ये हाच कल कायम ठेवण्याचा चव्हाण यांचा प्रयत्न आहे. न्येत्या रविवारी जिल्ह्य़ातील नऊ नगरपरिषदा आणि दोन नगर  पंचायतींसाठी मतदान होत असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची लढत ही काँग्रेस पक्षाशी पर्यायाने अशोक चव्हाण यांच्याशी आहे. भाजप-शिवसेनेची काही ठिकाणी युती केली आहे तर हदगाव मुदखेड आणि कंधार येथे हे दोन पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत. बिलोलीमध्ये काँग्रेसच्या विरुद्ध भाजपने शिवसेनेसह ‘राष्ट्रवादी’लाही सोबत घेत आघाडी केल्याचे दिसते. पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राज्यात भाजपला मोठे यश मिळाल्यामुळे त्याचा नांदेड जिल्ह्य़ात पक्षाला लाभ होईल, असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटतो.

कंधारमध्ये काँग्रेससोबतच भाजपच्या विरोधाशी ‘सामना’ करत आमदार प्रताप पाटील चिखलीकर निवडणुकीला सामोरे जात असून शिवसेनेतर्फे त्यांनी नगराध्यक्षपदासाठी मुस्लीम समाजातील महिलेला संधी देण्याचा प्रयोग केला आहे.

कंधार लगतच्या मुखेड नगर परिषदेत ‘राठोड गट जिकडे, सत्ता तिकडे’ असे गेल्या १५ वर्षांपासून चित्र असून राठोड परिवारातील ज्येष्ठ सदस्य किशनराव व त्यांचे पुतणे दोन वर्षांपासून भाजपवासी झाले आहेत. आता याच परिवारातील गंगाधर राठोड हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून तेथे सत्तांतर घडवून आणण्याचे आव्हान काँग्रेस व या पक्षाची पालखी वाहणाऱ्या बेटमोगरेकर बंधूंवर आहे.

नात्यागोत्याचे राजकारण

मुखेडलगतच्या देगलूर विधानसभा मतदारसंघात देगलूरसह कुंडलवाडी व बिलोली या तीन पालिकांची निवडणूक होत आहे. यातील देगलूर ही जिल्ह्य़ातील सर्वात मोठी नगर परिषद गेली १० वष्रे ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात असून तेथील नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी पक्षासह भाजप व काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. येथे ‘एमआयएम’ने मुस्लीम प्राध्यापकाला उमेदवारी देत काँग्रेस व ‘राष्ट्रवादी’च्या पारंपरिक मतपेढीच्या विभाजनाची खेळी केली आहे.

जिल्ह्य़ात नगराध्यक्षपदाच्या नऊ जागांसाठी एकंदर ५३ उमेदवार िरगणात असून त्यांच्यातील सर्वात प्रगल्भ, अनुभवी उमेदवार म्हणजे देगलूरला भाजपने उभे केलेले गंगाधर जोशी हे होत. त्यामुळेही देगलूरच्या निवडणुकीला महत्त्व आहे. कुंडलवाडीत भास्करराव खतगावकर यांनी भाजपच्या माध्यमातून तर बिलोलीत आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला आव्हान दिले आहे. कुंडलवाडी भाजपला नगराध्यक्षपदासाठी स्थानिक पातळीवर प्रभावशाली असलेल्या मन्नेरवारलू कुटुंबातील महिला उमेदवार देता आली. हा समाज तेथे मोठय़ा संख्येने असल्याने भाजपला लाभ उठविण्याची संधी आहे. बिलोलीत दोन स्थानिक आघाडय़ा विरुद्ध काँग्रेस अशी लढत असून नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस व आमदार अमरनाथ राजूरकर यांनी तेथे प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

सत्ता राखण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

भोकर पालिकेत काँग्रेसची सत्ता कायम आहे. आता मुदखेड नगर परिषद आणि अर्धापूर नगर पंचायतीतील आपली एकहाती सत्ता कायम राखण्याला अशोक चव्हाण व आमदार अमिता चव्हाण यांनी प्राधान्य दिले आहे. नगर परिषदांच्या रणसंग्रामात त्यांच्यासाठी मुदखेड- अर्धापूर म्हणजे ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे’ अशी स्थिती आहे; पण काँग्रेसने या वेळी मुदखेडलगतच्या उमरी नगर परिषदेवरही लक्ष केंद्रित करून नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत ‘राष्ट्रवादी’च्या तुलनेत सरस, सक्षम महिला उमेदवार दिली आहे. उमरी व धर्माबाद या दोन नगर परिषदा ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्यासाठी ‘कोंढाण्या’सारख्याच. २००१-०२ पासून या पक्षाचे तेथे निर्विवाद वर्चस्व; पण आता उमरीत त्यांना काँग्रेसने तर धर्माबादमध्ये काँग्रेससह भाजपने आव्हान दिले आहे.

हदगाव पालिका पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या ताब्यात आली. त्याआधी ती १० वष्रे शिवसेनेच्या ताब्यात होती. आता तेथे आमदार शिवसेनेचा आणि भाजपचे नेतृत्व माजी खासदार सुभाष वानखेडेंकडे. दोघे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी एकमेकाविरुद्ध दंड थोपटून मदानात उतरले आहेत. तर माजी आमदार, काँग्रेसचे माधवराव जवळगावकर हे या दोघांच्या भांडणात लाभ उठविण्याच्या प्रयत्नात आहेत.

एमआयएमने देगलूरसह, हदगाव, कंधार येथेही नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा केला असून ही बाब लक्षणीय ठरली आहे. माहूर नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप व शिवसेना अशी चौरंगी लढत आहे. ही पालिका काँग्रेसच्या ताब्यातून खेचून घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी’चे आमदार प्रदीप नाईक प्रयत्नात आहेत. शिवसेनेनेही तेथे जोर लावला आहे.