महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा परवा (बुधवार) दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. मनपाच्या सभागृहाचे नूतनीकरण सुरू असल्याने ही सभा अन्यत्र घ्यावी लागली.
मनपाच्या या सभेकडे पालिका वर्तुळासह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या खांदेपालटाच्या निर्णयानुसार आमदार संग्राम जगताप या सभेतच महापौरपदाचा राजीनामा सादर करतील अशी चर्चा असून, त्यामुळेच या सभेकडे सर्वाचे लक्ष आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर अन्य किरकोळ विषयच ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी उद्या (मंगळवार) मनपाच्या स्थायी समितीची सभा होणार असून, या सभेतही किरकोळ विषयच मंजुरीला ठेवण्यात आले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून मनपाच्या नव्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून त्यासाठी आग्रह होता. मात्र ते न झाल्याने मनपाच्या सत्तेत सहभागी असलेल्या नगरसेवकांनीच एका सर्वसाधारण सभेत आंदोलन केल्यामुळे नंतर या कामास गती देण्यात आ्रली. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून हे सुरूच आहे. पूर्वी मनपाच्या जुन्या इमारतीतील ऐतिहासिक ‘कौन्सिल हॉल’ सभागृहातही मनपाच्या सभा होत, मात्र ते सभागृह तीन वर्षांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाले आहे. पूर्वीचाच बाज कायम ठेवून या सभागृहाच्या नूतनीकरणाच्या भीमगर्जना करूनही मनपाला ते शक्य झाले नाही. त्यामुळेच ही सर्वसाधारण सभा अन्यत्र म्हणजे थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घ्यावी लागली.