केडगावचा पाणीप्रश्न चिघळला
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असले तरी, विविध कारणांनी शहराचा पाणीपुरवठा पुरता विस्कळित झाला असून याबाबत नगरकरांमध्ये आता असंतोष व्यक्त होऊ लागला आहे. याच उद्रेकातून केडगाव परिसरातील शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी गुरूवारी रात्री महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना चांगलीच मारहाण केल्याचे समजते.
मनपाच्या आरटीओ टाकीवर गुरूवारी मध्यरात्री दिलीप सातपुते व दिपक खैरे या दोन नगरसेवकांनी विभागनिहाय पाणी सोडणाऱ्या मनपाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची चर्चा आहे. हे दोघे नगरसेवक मध्यरात्री या टाकीच्या ठिकाणी गेले असता या कर्मचाऱ्यांनी निर्धारीत वेळापत्रकानुसारच पाणी सोडण्याची मागणी केल्याने संतप्त झालेल्या या नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना चांगलीच मारहाण केल्याचे समजते. तेवढय़ावरच हे नगरसेवक थांबले नाही. त्यांनी या कर्मचाऱ्यांना मारहाण करून येथून अन्य भागासाठी सोडलेले पाणी बंद करून ते केडगावकडे वळवले. मध्यरात्री बराच वेळ ते तसेच सुरू होते, असे समजते.
केडगावला पाणी वळवल्याने शहराच्या अन्य भागातील पाणीपुरवठा बंद झाला. याबाबत सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मारहाणीचा इन्कार केला. ते म्हणाले, केडगावमधील बऱ्याचशा भागात तब्बल तेरा दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा अंसतोष आहे. याबाबत संबंधितांशी वारंवार चर्चा करूनही केडगावकडे दुर्लक्षच होत आहे. त्याचाच जाब विचारण्यासाठी आरटीओ टाकीवर गेलो होतो.
दरम्यान या मारहाणीची मनपा वर्तुळातही चर्चा होती. मात्र संबंधीत कर्मचाऱ्यांनीच त्यावर पडदा टाकल्याने याबाबत कोणतीच कारावाई होऊ शकली नाही.