चंद्रपूर, लातूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांसाठी आज मतदान झाले. कडक उन्हाळ्यामुळे मतदानाची वेळ वाढवण्यात आली होती. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज आहिर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख, भाजप नेते संभाजी निलंगेकर-पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या तिन्ही महापालिकांमध्ये सकाळी ७.३० ते संध्याकाळी ६.३० या वेळेत मतदान झाले. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी ५७ टक्के, परभणी महानगरपालिकेसाठी ७० टक्के तर लातूर महानगरपालिकेसाठी ६० टक्के मतदान झाले.

चंद्रपूर महापालिकेतील ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात होते. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत येथे झाली. चंद्रपूर शहर हे परकोटाच्या आत व परकोटाच्या बाहेर अशा दोन भागात विभागले गेले आहे. महापालिका निवडणुकीचा इतिहास बघता परकोटाच्या आत जुन्या चंद्रपुरात काँग्रेस तर परकोटाबाहेर नवीन शहरात भाजप अधिक जागा जिंकत आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी विकासाच्या मुद्यावर भाजप सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसची धुरा माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडे असून भाजपचे मनसुबे उधळून लावणार असे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी चंद्रपूरची निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. मुस्लीम, दलित, माळी, सिंधी, तेली व कुणबी हा समाज कोणाला साथ देणार याची उत्सुकता आहे. भाजपने ६६ पैकी एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार दिलेला नाही.

लातूर महापालिकेत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. महापालिकेवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी काँग्रेस इच्छुक असून विजयासाठी भाजपनेही जोर लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लातूरमध्ये प्रचारसभा घेतली आहे. पिण्याचे पाणी, कचरा, सांडपाण्याची प्रक्रिया, रस्ते या मुद्द्यावरुन भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये लातूरमध्ये मुसंडी मारल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि पालकमंत्री व भाजप नेते संभाजी निलंगेकर-पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लातूरमध्ये ७० जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहे.

परभणीत भाजपने फारसे लक्ष दिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर आणि लातूरमध्ये प्रचारसभा घेतली. पण परभणीत ते फिरकले नाहीत. त्यामुळे भाजपला परभणीकडून फारशी अपेक्षा नाही असे दिसते. परभणीमध्ये राष्ट्रवादीचे प्रस्थ आहे. शिवसेना आणि काँग्रेसने परभणीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका गमाविल्याने परभणीमध्ये सत्ता कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. मुस्लीमबहुल असलेल्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने मुस्लीम उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. परभणीमध्ये ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात आहे.

LIVE UPDATES:

०५.५५: लातूरमध्ये दुपारी ३.३० पर्यंत ४०.२५ टक्के मतदान

०३:४८: चंद्रपूरमध्ये दीडपर्यंत २५ ते २७ टक्के मतदान

०२:३० सकाळी ७.३० ते ११.३० पर्यत चंद्रपूर महानगर पालिकेसाठी १९. २० टक्के मतदान

०२:00: लातूरमध्ये ११.३०पर्यंत सरासरी २२टक्के मतदान

११:१८: लातूरमध्ये सकाळी १० पर्यंत सरासरी ८ टक्के मतदान