बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी, अंबाजोगाई या सहा नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. तारखा जाहीर झाल्याने सर्वच पक्षांनी नगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून युतीबाबत अजूनही संभ्रमच असल्याने बहुरंगी लढतीचे संकेत मिळू लागले आहेत. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सर्वत्र उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात सहा नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारी २४ ऑक्टोंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने इच्छुक धडपड करू लागले आहेत. दिवाळी आधीच उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार असल्याने नेते मंडळींकडून बठकांचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजप, शिवसेना, शिवसंग्राम आणि ‘एमआयएम’ने दंड थोपटले आहेत. काँग्रेसनेही येथील निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीला आव्हान दिले असून राष्ट्रवादीमधील बंडखोरांचा गटही तयारीला लागला आहे. युतीबाबत अजूनही निर्णय न झाल्याने याठिकाणी बहुरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. गेवराईमध्ये भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी तयारी चालवली आहे. आमदार अमरसिंह पंडित गट राष्ट्रवादीच्या झेंडय़ाखाली लोकांमध्ये जाऊन मिसळू लागला आहे. तर माजी मंत्री बदामराव पंडित यांनी मित्रमंडळाच्या माध्यमातून ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते अ‍ॅड. सुरेश हात्ते यांनी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमआयएम’नेही त्याठिकाणी निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. माजलगावमध्ये नगरपालिकेवर शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने युतीच्या सत्तेला हाबाडा देण्याचा प्रयत्न चालविला असून राष्ट्रवादीतील नाराज गटही मित्रमंडळाच्या माध्यमातून चाचपणी करू लागला आहे. अंबाजोगाईत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांची एकहाती सत्ता आहे.

यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सत्ता मिळवली. या वेळी मात्र स्वतच जिल्हाध्यक्ष असल्याने पंजा या चिन्हावरच त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांनीही नगरपालिकेची तयारी सुरू केलेली आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात मात्र अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेने मोठय़ा प्रमाणावर विकासकामे करत निवडणूकपूर्व तयारी करुन ठेवलेली आहे. याठिकाणी भाजपकडून सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपकडून मात्र अजूनही कोणत्याच हालचाली होताना दिसून येत नाहीत. ‘एमआयएम’सह काँग्रेसने मात्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर धारुर नगरपालिकेत भाजपच्या सहकार्याने राष्ट्रवादीच्या एका गटाने नगराध्यक्षपदाची खुर्ची राखलेली असून त्याठिकाणी एक हाती सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीसह भाजपकडूनही प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीची तयारीही सुरू केली असून कार्यक्रम जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बठक घेऊन कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवसेनेनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून सहाही नगरपालिकांमध्ये बहुरंगी लढती पहायला मिळणार आहेत. तर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सर्वच पक्षांकडून अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.