नोटबंदीमुळे उमेदवार हैराण

नांदेड जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच इच्छुक उमेदवारांनी पशांची जमवाजमव करून ठेवली आहे. त्यामुळे या पशांच्या जोरावर ही निवडणूक लढवण्याचा इरादा पक्का करणाऱ्या उमेदवारांचे अवसान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गळून पडले आहे. जमवलेले लाखो-करोडो रुपयांचे करायचे काय, या चिंतेत इच्छुक उमेदवार सापडले आहेत. पाचशे-हजारच्या नोटा बंद झाल्याने निवडणुकीत कसा पैसा खर्च करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

३१ डिसेंबरपूर्वी जमवलेल्या नोटांची जितकी विल्हेवाट लावता येईल तितकी लावावी व उर्वरित पसा आतापासूनच मतदारांत वाटून आपले पारडे जड करावे, या विचारात अनेक इच्छुक उमेदवार असल्याचे कळते.

नांदेड जिल्ह्यातील कंधार, बिलोली, हदगाव, देगलूर, धर्माबाद, उमरी या नगरपरिषदांसह अर्धापूर व माहूर या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका १९ डिसेंबर रोजी होणार आहेत. याची अधिसूचना नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केली आहे. सध्या होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असे सर्व पक्ष एकत्र आले आहेत.

परंतु नगरपरिषद निवडणुकांचा फंडा वेगळा असणार आहे. भाजपला पक्षाची पाळेमुळे ग्रामीण भागापर्यंत रुजवायची असल्यामुळे या निवडणुका भाजप एकटय़ानेच लढवण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळे लढत असल्याने या निवडणुकीतही चित्र असेच दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनाही भाजपसोबत फरफटत जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे या पालिकांच्या निवडणुका चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे.

या निवडणुकांत राजकीय पक्षाकडून मतदारांना लक्ष्मीदर्शन होण्याची मोठी आशा होती, परंतु निवडणुकीपूर्वीच पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाल्याने राजकीय पक्षांचे व इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.