यवतमाळच्या तरुणाचा कौंडण्यपूरजवळ खून
वार्ताहर, यवतमाळ
येथील एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीबाबत वक्रदृष्टी ठेवल्यामुळे त्याचा मित्रानेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना आर्वी तालुक्यातील देउरवाडा येथे घडली.
यवतमाळच्या पुष्पकुंज सोसायटीतील डॉ. वामन हेपट यांचा मुलगा सचिन (२७) याचा मृतदेह देउरवाडा येथे एका नाल्यात सापडला. सचिन हेपट कापूस विकून आलेले पसे घेऊन अहिरवाडय़ाला गेला होता. तेथे तो सचिन धुर्वेकडे मुक्कामाला होता. रात्री सचिन हेपट आणि समीर व सचिन हे धुर्वे बंधु, असे तिघे जण गप्पा करीत असताना सचिन हेपटने सचिन धुर्वेच्या पत्नीबाबत दुर्भावना व्यक्त करणारे भाष्य केल्यामुळे संतापलेल्या धुर्वे बंधुंनी त्याचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह देउरवाडा ते कौंडण्यपूर मार्गावर शिवारात फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी सचिन व समीर धुर्वे या दोघांना ताब्यात घेतले आहे.

मलकापुरात विषमज्वर, हिवताप
बुलढाणा : मलकापूरमध्ये विषमज्वर व हिवतापाने थमान घातले असून सर्व खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी होत असल्याने डॉक्टरांना रात्रंदिवस रुग्णांची पाहणी करावी लागत आहे. त्याचप्रमाणे पॅथॉलॉजीवाल्यांचीही कसरत होत आहे. उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कर्मचारी कमी असल्याने बऱ्याच रुग्णांची धाव खासगी रुग्णालयाकडे आहे.
शहरात नगरपरिषदेकडून २० ते २५ दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागते. त्या पाण्यात जिवाणू निर्माण होत असल्याने या रोगांना आमंत्रण दिले जात आहे. तसेच नगरपालिकेकडून नाल्यांची नियमित सफाई आणि फवारणी होत नसल्याने शहरात डासांमुळे विषमज्वराचे प्रमाण वाढले आहे.