डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे फरार मारकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात शासन टोकाची दिरंगाई करीत आहे. शासनाकडून या दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे राज्यातील पोलीस दलाचे हसे होत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने २० जुलैपासून सुरू केलेल्या ‘जवाब दो’ या आंदोलनाची तीव्रता येत्या दहा दिवसांत वाढविली जाणार आहे.

याबाबतची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली. अंनिसचे जिल्हाध्यक्ष वंदना माने आणि कुमार मंडपे उपस्थित होते. डॉ. दाभोलकर पुढे म्हणाले, सारंग अकोलकर आणि विनय पवार तसेच त्यांचे साथीदार प्रवीण लिमकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेगडे हे २००९ पासून मडगाव बॉम्बस्फोटानंतर गेली ८ वष्रे फरार आहेत. या दोघांना पकडण्यामध्ये गेली आठ वष्रे जी अक्षम्य दिरंगाई झाली आहे, त्यामुळेच डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांचे खून झाले. तर या फरार लोकांना वेळीच अटक झाली असती, तर हे तिन्ही खून टळले असते. या सर्व दिरंगाईचा जाब अंनिसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्य़ातील आमदार व खासदार यांना प्रत्यक्ष भेटून विचारणार आहेत. येत्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून त्याची चर्चा करावी, अशी मागणी देखील स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

सारंग आकोलकर व विनय पवार या डॉ. दाभोलकर व कॉम्रेड पानसरे यांच्या संशयित मारेकऱ्यांची छायाचित्रे असलेली पोस्टर अंनिस राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात लावणार असून डॉ. दाभोलकर आणि पानसरे या दोघांच्या खुनामध्ये मिळून या दोघांवर २० लाख रुपयांचे इनाम शासनाने जाहीर केले आहे. हे जनतेपर्यंत पोहोचविले जाणार आहे. या अभियानांतर्गत रस्ता जागर उपक्रमात राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ांमध्ये संशयित मारेकऱ्यांची चित्रे असलेली पत्रके वाटण्यात येणार असल्याचे प्रशांत पोतदार यांनी सांगितले. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली येथे देखील जवाब दो आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केरळ, पंजाब, हरियाना, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्येही हे आंदोलन केले जाणार आहे. सातारा येथे १५ ऑगस्टपासून रस्ता जागर उपक्रमाच्या अंतर्गत शहरातील प्रमुख ठिकाणी सारंग अकोलकर आणि विनय पवार या फरार मारेकऱ्यांचे फोटो असलेली पत्रके वाटण्यात येणार आहेत. तसेच २० ऑगस्ट रोजी निषेध फेरीचे आयोजन केले आहे. ग्रहणाच्या काळात घरातून बाहेर पडू नये, या गैरसमजातून गर्भवतीला प्राण गमवावा लागल्याची घटना सातारा येथे नुकतीच घडली. या पाश्र्वभूमीवर ग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो, ही अंधश्रद्धा असून लोकांनी त्याला बळी पडू नये यासाठी अंनिस समाज प्रबोधन मोहीम राबवणार असल्याचे प्रशांत व डॉ. हमीद यांनी सांगितले.