लग्नात माहेरच्या मंडळींनी योग्य मानपान केला नाही, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दुचाकी वाहनाकरिता ५० हजारांची रक्कम माहेरातून आणून दिली नाही म्हणून सासरीच्या मंडळींनी पूनम किरण गुळवे (२२) या नवविवाहितेचा जाळून खून केल्याची घटना शहरातील मुरारजी पेठेत निराळे वस्तीमध्ये घडली. याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघा जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मृत पूनम हिचे वडील अशोक पांडुरंग मोरे (६२, रा. विष्णू मिल चाळ, डोणगाव रोड, सोलापूर) यानी यासंदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पूनम हिचा पती किरण (२४) याच्यासह सासू कलावती (४५) व सासरा दीनानाथ रामचंद्र गुळवे (५०) यांनी मृत पूनम हिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला. पूनम हिचा विवाह किरण याच्याबरोबर झाल्यानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी तिला चांगली वागणूक दिली. परंतु थोडय़ाच दिवसांनी तिचा छळ सुरू केला. लग्नात माहेरच्या मंडळींनी योग्य मानपान केला नाही, महाविद्यालयास जाण्यासाठी दुचाकी वाहन घेण्याकरिता ५० हजारांची रक्कम माहेरातून घेऊन येत नाही म्हणून पती किरण याच्यासह सासरा दीनानाथ व सासू कलावती हे तिला त्रास देत होते. याच कारणावरून किरण याने पूनम हिच्याशी भांडण काढले. त्यावेळी रागाच्या भरात किरण व सासरा दीनानाथ या दोघांनी पूनम हिला पकडून धरले आणि सासू कलावती हिने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पती किरण व सासरा दीनानाथ या दोघांना अटक करण्यात आली आहे.