सुगावा नाही; सासू जबाबदार असल्याचा आईचा आरोप
लाखनीच्या तीन सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या झाल्याच्या प्रकरणाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील वातावरण प्रचंड तणावाचे झाले असून बुधवारी दोन्ही जिल्ह्य़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. या मुलींच्या मारेक ऱ्यांचा अद्याप कोणताही सुगावा पोलिसांच्या पथकांना मिळालेला नाही. बलात्कारी आणि मारेकरी बाहेरचे असल्यास त्यांचा ठावठिकाणा मिळवणे मोठे आव्हान ठरणार आहे. मुलींची आई माधुरी बोरकर यांनी मुलींच्या हत्याकांडासाठी आपली सासू जबाबदार असल्याचा आरोप करून खळबळ उडविली. यातून काहींना रात्रभरात अटक होण्याची शक्यता आहे.
मुलींचा शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर हादरलेल्या पोलिसांनी या प्रकरणात एकूण तीन संशयितांची पोलिसांनी चौकशी केली असली तरी त्यातून काहीच निष्पन्न होऊ शकलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी नागपूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी कडक आदेश जारी केले असून पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनाही तंबी देण्यात आल्याचे समजते. मुलींच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या तिच्या नातेवाईकांना पोलिसांनी रात्री दीड वाजेपर्यंत नुसतेच बसवून ठेवले होते, असा आरोप करण्यात आल्यानंतर ठाणे प्रदीप मुंडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाखनी तालुक्यातील मुरमाड/सावरी येथील तनुजा (११) प्राची (९) आणि प्रिया बोरकर या तीन सख्ख्या बहिणीचे मृतदेह गावाबाहेरील विहिरीत सापडल्यानंतर त्यांच्या मृत्यूविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते.
आता या प्रकरणात मुलींची आई माधुरी बोरकर यांनी या हत्याकांडाला सासू सत्यशीला बोरकर याच जबाबदार असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या माधुरी बोरकर यांच्यासोबत त्यांची आई रेखा भेंगार आणि मुलींचे मामा अरुण गोतमारे हेदेखील होते. विधवा असलेल्या माधुरी बोरकरांचा सासरी छळ होत होता. त्यांना एक-दोनदा विहिरीत ढकलून मारण्याचाही प्रयत्न झाला होता, असे त्यांनी सांगितले.