परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागलेल्या ३७ मुस्लीम तरुणी व विवाहित महिलांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारी अभ्यासक्रमास नुकताच प्रवेश घेतला असून, पदवीधर बनण्यासाठी एक पाऊल टाकले आहे.. या सर्व महिला पुणे जिल्ह्य़ातील शिरूर या एकाच गावच्या आहेत आणि त्यांच्या शिक्षणासाठी स्थानिक मुस्लीम नेतृत्९व व महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे.
मुस्लीम समाजातील मुला-मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळावी याकरिता शिरूर मुस्लीम जमातचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर, बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार निकम व मुक्त विद्यापीठ केंद्राचे प्रा. चंद्रकांत धापटे यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच या मुला-मुलींना शिक्षणाच्या विकासाच्या संधी काय आहेत, याबाबतचे मार्गदर्शन प्राचार्य निकम व प्रा. धापटे यांनी येथील उर्दू शाळेच्या पटांगणात आयोजित केले होते. त्याला मुस्लीम मुले-मुली, महिला व नागरिक उपस्थित होते. याच्या दुसऱ्या दिवशी मुस्लीम समाजातील ५३ जणांनी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यात ३७ महिला व विद्यार्थिनी यांचा समावेश आहे.
प्राचार्य निकम यांनी ग्वाही दिली, की आर्थिक कारणांमुळे कोणाचेही शिक्षण अडणार नाही. बोरा महाविद्यालयातील शिक्षकही त्यांना आर्थिक मदत करतील. उर्दू माध्यमातून शिकलेल्यांसाठी मराठी, इंग्रजी भाषेचे विशेष वर्ग विनामूल्य घेण्यात येतील. या उपक्रमासाठी शिरूरचे माजी नगराध्यक्ष नसिम खान, मुस्लिम ओबीसी संघटनेचे चाँदभाई बळबट्टी, मोहम्मद हुसेन पटेल, मेहबूब सय्यद, साबिरभाई शेख, हाजी मुश्ताक शेख, अ‍ॅड. अब्दुल वहाफ पटेल, शाबान शेख यांनीही पुढाकार घेतला आहे. शिरूर मुस्लीम जमातनेही या कामी आर्थिक मदत देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

‘आम्हाला बदलायचेय’ आपण पुन्हा शिक्षणाकडे का वळलो, या बाबत या महिलांनी सांगितले, ‘काळ बदलला आहे. या बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्याकरिता आम्हाला बदलावे लागेल, हे शिक्षणाच्या माध्यमातून होईल, त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी आम्ही शिकणारच.’ यापैकी काही जणींना अर्धवट शिक्षण सोडण्याची खंत आहे. हा अर्धवट शिक्षणाचा शिक्का पुसून पदवीचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. समाजातील काही महिलांना वास्तव व व्यावहारिक जगाची जाणीव होऊ लागली असून, दररोजची वाढणारी महागाई, वाढलेल्या गरजा, खर्च यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावायचा आहे, तर काहीजणींना मुला-मुलींची करीअर घडवायची आहेत.