तारुण्य सुलभ भावनेने घसरणारे पाऊल.. त्यात व्यसनाधीन झालेले शरीर.. दुरावलेले आप्त, या नैराश्यात असताना वंध्यत्वाची लागलेली चाहूल, यावर सूचक भाष्य करणारा ‘द मिथ’ लघुपट बंगळुरू येथे आयोजित आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. नाशिकच्या कलाकारांची ही निर्मिती महोत्सवात सर्वाच्या उत्सुकतेचा विषय ठरली.
या महोत्सवात ५०० हून अधिक  लघुपट १६० भाषांमध्ये प्रदर्शित झाले. ५० हून अधिक देशांनी त्यात सहभाग नोंदविला. नाशिकमधून केवळ जयेश आपटे दिग्दर्शित, लिखित या एकाच लघुपटाची निवड झाली. लघुपटात तरुणांमध्ये वंध्यत्व निर्माण होऊन ते लपविण्यासाठी होणारा केविलवाणा प्रयत्न, अंधश्रद्धेचा घेतलेला आधार यावर भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटात नाशिकच्या स्थानिक कलावंतांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. विजय साळवे, प्रशांत केळकर, ॠषीकेश उमरजीकर, आनंद ओक, अपूर्वा सबनीस, किरण जायभावे, रुपाली देशमुख, चेतन बडगुजर, पीयूष नाशिककर, शुभम साळवे या कलाकारांसोबत सई मोराणकर, प्राज्ञी देशमुख, ओवी भालेराव, मल्हार केळकर, मयूरेश कुलकर्णी, वेदांत कुलकर्णी, पुष्कर भालेराव आणि अन्य कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
मिहीर कोठारी यांनी कॅमेरा सफाईदारपणे हाताळला असून पाश्र्वसंगीत आनंद ओक, वेशभूषा अपूर्वा सबनीस, रंगभूषा ललित कुलकर्णी, संकलन महेश देशपांडे, सुमंत वैद्य यांनी केले आहे. तांत्रिक बाजू पूजा साळुंखे, यतीन कराळकर यांनी सांभाळली आहे. महोत्सवात दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, नसरुद्दीन शहा आणि जॅकी श्रॉफ यांनी आपले लघुपट सादर केले. चित्रपटाचा आशय आणि विषय यामुळे नाशिकच्या लघुपटाने सर्वाचे लक्ष वेधले.