नगर जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या शेतकरी विकास मंडळ पॅनेलला पुन्हा सत्ता राखण्यात गुरुवारी यश मिळाले. एकूण २१ जागांपैकी या पॅनेलचे ११ उमेदवार विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील, भाजप, शिवसेनेच्या जिल्हा विकास आघाडी पॅनेलला ९ जागांवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीत सत्ता राखण्यात थोरात यांना यश आले असले, तरी ९ जागा जिंकत विखे-पाटील यांनी सुद्धा त्यांना जोरदार टक्कर दिली असल्याचे दिसते आहे. या निवडणुकीत राजीव राजळे हे स्वतंत्रपणे निवडून आले आहेत. त्यांनी शेतकरी विकास मंडळ पॅनेलला पाठिंबा दिल्यास या पॅनेलच्या जागा १२ जातील. दरम्यान, माजी आमदार आणि सध्याचे संचालक अशोक काळे यांना या निवडणुकीत पराभवाचा झटका बसला आहे. कोपरगावमधून त्यांना बिपिन कोल्हे यांनी पराभत केले.