सोनोग्राफीचा दुरुपयोग आणि सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या रुग्णांची नोंद न ठेवल्याबद्दल उमरेड येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने डॉ. अभय परातेला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. डॉ. परातेचे उमरेड शहरात खासगी रुग्णालय आहे. सोनोग्राफीद्वारे प्रसूतिपूर्व लिंगचाचणी करीत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन तडस यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी २९ जून २०११ रोजी डॉ. परातेच्या रुग्णालयाची तपासणी केली. त्यात डॉ. पराते सोनोग्राफीद्वारे प्रसूतिपूर्व लिंगचाचणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नोंदीही ठेवलेल्या नसल्याचे चौकशीत दिसून आले. त्यामुळे डॉ. तडस यांनी डॉ. परातेविरोधात उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रसूतिपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ (१) (४) आणि १३ अन्वये गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. उमरेड येथील प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एल. भोसले यांनी या प्रकरणाची सुनावणी केली.  
त्यांनी आरोप स्पष्ट झाल्याने डॉ. परातेला तीन वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील आनंद ठाकरे, अ‍ॅड. बारस्कर, विधी सल्लागार अ‍ॅड. वैशाली वाघमारे यांनी युक्तिवाद केला. या निर्णयामुळे शहरासह जिल्ह्य़ातील सोनोग्राफी केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.