मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिक्षक व पदवीधर मतदारसंघ रद्द करण्याबाबत संकेत देताच नागपूरचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाही मार्गाने लोकांचे प्रश्न उपस्थित करणारी यंत्रणा राजकीय नेत्यांना नको असल्याची टीका नागो गाणार यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर दिला.
सरकार कोणत्याही पक्षाचे असो, नागरिकांच्या प्रश्नांना राजकीय मुलामा न देता लोकोपयोगी प्रश्नांवर सरकारला थेट कचाटय़ात पकडणाऱ्या विधान परिषदेतील शिक्षक व पदवीधर आमदारांचा सत्ताधाऱ्यांना त्रास
होतो. कारण, शासनाच्याच निर्णयांची आठवण करून देत, वेगवेगळ्या प्रश्नांवर हेच आमदार बोलत असतात.  विधानसभेत लोकप्रतिनिधींकडून लोकांच्या प्रश्नांची तड न लागल्यास विधान परिषद हे मान्यवरांचे वरिष्ठ सभागृह प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध राहावे, अशी तरतूद असताना शिक्षक व पदवीधर मतदारसंघ रद्द करण्याची घाई का, असा प्रश्न गाणार यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपाल नामित १२ प्रतिनिधींचा दर्जा पूर्वीसारखा तटस्थ राहिला नसून तेही राजकीयदृष्टय़ा प्रभावित आहेत. मात्र, आजही केवळ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे प्रत्येकी सात आमदार सर्वसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करतात, असा दावा गाणार यांनी केला आहे.