अपेक्षित ‘रसद’ मिळणे बंद झाल्याने खबऱ्यांनी असहकार पुकारला असून परिणामी गंभीर गुन्ह्य़ांच्या तपासात पोलिसांना अडचणी येत असल्याची, तसेच राज्यात कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
शहरात सध्या कायदा व सुव्यवस्थेचे मातेरे झाले आहे. गुन्ह्य़ांना काळवेळ राहिलेला नाही. चालू वर्षांत येथील धंतोली, सीताबर्डी, सोनेगाव व कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एकूण चार खुनांचे गूढ पोलीस अद्यापही उकलू शकलेले नाहीत. २०११ ते २०१३ या तीन वर्षांत सात खुनांचा तपास लागलेला नाही. पूर्वी एखादी गंभीर घटना घडल्यानंतर गुन्हे शाखा, तसेच पोलीस ठाण्यांसह सर्वच पोलीस अधिकारी त्यांच्या खबऱ्यांना कामाला लावत. आता तपासासाठी सामूहिक प्रयत्न अभावानेच आढळतो. बहुतांश पोलीस ठाण्यात ‘कामापुरते काम’ केले जाते. अपुरे मनुष्यबळ, साधनांची कमतरता, वाढलेली लोकसंख्या, गुन्हेगारांकडून अवलंबिण्यात येणाऱ्या नवनवीन पद्धती, अशी कारणे सांगून स्वत:च्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचे लोक बोलू लागले आहेत.  तपास न लागण्याचे एक कारण म्हणजे, पोलिसांचे खबरे सध्या सैरभैर झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खबऱ्यांना आर्थिक मदत मिळेनाशी झाल्याने त्यांनी सहकार्य करणे थांबविले असून त्याचा फटका गुन्हे तपासाला बसत आहे. खबऱ्यांसाठी येणाऱ्या निधीला गेल्या काही महिन्यात कात्री लागल्याने पोलीस हतबल झाले आहेत. या वर्षभरात खबऱ्यांसाठी दमडीही मिळालेली नाही. या वर्षभरात राजकीय अस्थैर्यामुळे अर्थकारण विस्कळीत झाले. परिणामी, पोलिसांना दिवाळीपूर्वी वेतन देता आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. वेगवेगळ्या भागातून नवनवे गुन्हेगार येत असल्याने त्यांची माहिती मिळणे कठीण होत चालले आहे. मदतीअभावी खबऱ्यांचे असहकार्य यामुळे गुन्हेगारांचे मात्र फावतच आहे.
‘सोर्स मनी’बाबत सारेच गप्प
‘सोर्स मनी’ संवेदनशील विषय असल्याने त्याच्या नेमक्या तरतुदींविषयी कुणीही बोलायला तयार नाहीत. शहरात खबरे प्रभावीपणे काम करीत असल्याचा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर केला. गेल्या वर्षी गंभीर गुन्ह्य़ांच्या तपासाचे प्रमाण ५७ टक्के होते. यावर्षी ते ९४ टक्के आहे. खबरे प्रभावी असल्यानेच हे शक्य झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अनेकदा संशयित असले तरी पुरावा मिळत नाही. त्यामुळे त्याला अटकही करता येत नाही. त्यातच इतरही घटना घडतात आणि त्यांच्याही तपासाला लागावे लागते. बंदोबस्तही करावा लागतो. सातत्य न राहिल्याने एखादा गुन्ह्य़ाचा तपासच लागत नाही, असे मत यासंदर्भात त्यांनी व्यक्त केले.