नांदेड महापालिका निवडणुकीतील पराभवावरुन शिवसेनेने भाजपचा समाचार घेतला आहे. अशोक चव्हाणांनी भाजपच्या विजयाचा चौखूर उधळलेला वारु रोखला असून फोडाफोडीचे आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नसते, हा या निवडणुकीचा सर्वात मोठा धडा असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ८१ पैकी ७३ जागा जिंकून अभूतपूर्व यशाची नोंद केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर आणि भाजपचे अन्य नेते नांदेडमध्ये प्रचारात उतरले होते. ‘५१ पेक्षा अधिक’चे लक्ष्य जाहीर करणाऱ्या भाजपला निवडणुकीत फक्त ६ जागांवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर तोंडसूख घेण्यात आले आहे. नांदेड महापालिका निवडणुकीतील विजयाने काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचे काम केले असे शिवसेनेने म्हटले आहे. भारत काँग्रेसमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवणाऱ्या भाजपसाठी नांदेडचा निकाल धक्कादायक असून भाजपचा पराभव होऊ शकतो असा संदेश या निवडणुकीने दिला. या पराभवाने भाजपच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला असून सत्ता, पैशांचा वापर करणाऱ्या आणि आयाराम- गयारामांना मिठी मारणाऱ्यांना जनतेने का नाकारले याचे आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला शिवसेनेने दिला.

विधानसभा निवडणुकीप्रमाणे नांदेड महापालिका निवडणुकीतही भाजपने आयारामांचे दुकानच उघडले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला, पण पक्षांशी बेईमानी करुन गेलेल्या बहुतांशी नव्या ‘कमळ’धाऱ्यांना जनतेने नाकारले. फोडाफोडीचे आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही, हा या निवडणुकीता धडा असल्याचे सेनेने म्हटले आहे.

दलित आणि मुस्लीम मतांना मिळवण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरले. नांदेडात लोणचे घालायलाही काँग्रेस उरणार नाही, हा फाजील आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांना महागात पडला असेही अग्रलेखात म्हटले आहे.