23 October 2017

News Flash

दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्रास वीरमरण

१६ डिसेंबर २००२ मध्ये ते सैन्यात भरती झाले होते.

धुळे | Updated: October 11, 2017 9:38 PM

जम्मू कश्मीरमधील बांदिपोरा सेक्टरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांशी लढतना मिलिंद किशोर खैरनार यांना वीरमरण आले. ते नंदुरबार जिल्ह्यातील बोराळ येथील रहिवासी होते. त्यांचे कुटुंबीय सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत. शहीद मिलिंद खैरनार यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी, तसेच ६ वर्षांची मुलगी आणि २ वर्षांचा मुलगा अशी दोन अपत्य आहेत.

मिलिंद खैरनार त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह

मिलिंद किशोर खैरनार यांचे मूळगाव नंदुरबार जिल्ह्यात असले तरी त्यांचे वडील किशोर खैरनार हे साक्री येथे वीज महामंडळाच्या कार्यालयात नोकरीस होते. त्यामुळे त्यांचे बालपण हे धुळे जिल्ह्यातील साक्री येथेच गेले. मिलिंद खैरनार धुळ्यात आपल्या मामांकडे शिक्षणासाठी होते. येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १६ डिसेंबर २००२ मध्ये ते सैन्यात भरती झाले. त्यांचे वडील किशोर सदाशिव खैरनार हे सेवानिवृत्त वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असून त्यांचा मोठा भाऊ मनोज खैरनार मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. मिलिंद खैरनार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर नंदुरबारसह धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

मिलिंद खैरनार त्यांच्या कुटुंबियांसोबत

बांदिपोरामधील हाजिन भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. तर मिलिंद किशोर खैरनार यांच्यासह निलेश कुमार शहीद झाले.

मिलिंद किशोर खैरनार

First Published on October 11, 2017 9:38 pm

Web Title: nandurbar district sergeant milind kishor khairane martyr in jammu kashmir