‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची स्थापना करुन राजकारणातील नव्या इनिंगला सुरुवात करणारे नारायण राणे मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते. राणेंचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानण्यात येत असून, त्यांना महसूल, गृह किंवा गृहनिर्माण या तीन पैकी एक खाते मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर नारायण राणेंनी रविवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली होती. शिवसेनेवर तिखट शब्दांत टीका करणाऱ्या राणेंनी भाजपविषयी मवाळ भूमिका घेत भावी वाटचालीचे संकेत दिले होते. शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा वापर करण्याची भाजपची खेळी आहे. या पार्श्वभूमीवर राणे मंगळवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर पोहोचले. या बैठकीत मंत्रिपदाविषयी चर्चा झाल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. राणेंना महत्त्वाचे खाते मिळू शकते. गृह, महसूल किंवा गृहनिर्माण खाते त्यांना दिले जाऊ शकते. सध्या गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. तर महसूल खाते चंद्रकांतदादा पाटील आणि गृहनिर्माण खाते प्रकाश मेहतांकडे आहे. त्यामुळे राणेंना नेमके कोणते खाते दिले जाते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. शिवसेनेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी राणेंचा वापर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे राणेंचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा धोका पत्कारतानाच सरकार स्थिर ठेवण्याचे आव्हान देवेंद्र फडणवीस कसे पेलवतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येणार का असा प्रश्न विचारला. यावर मी त्यांना दोन दिवसांत उत्तर कळवणार आहे, असे राणेंनी सांगितले. मंत्रिपदाविषयी कोणतीची चर्चा झाली नाही असा दावाही त्यांनी केला.