काँग्रेस सरकार शेतकरी, गोरगरिबांचे तर आजचे केंद्र व राज्यातील भाजप सरकार धनदांडग्यांचे असल्याचा प्रहार माजी मुख्यमंत्री आम. नारायण राणे यांनी कुडाळ येथे केला. नोटाबंदीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या बेबंदशाहीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मोठा आर्थिक फटका बसला आहे, असे राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कुडाळ येथे ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या सिंधुकृषी व पशू-पक्षी, औद्योगिक व पर्यटन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी नारायण राणे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कुडाळ नगराध्यक्ष विनायक राणे, जि.प. माजी अध्यक्ष रणजीत देसाई, आर. के. जोशी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

नोटाबंदीमुळे शेतकरी, सामान्य जनतेला केंद्र सरकारने वेठीस धरले आहे. देशात बेबंदशाही निर्माण करून देश दिवाळखोरीत नेण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी चालविला आहे. उद्योगपतीचे हे सरकार असून, शेतकरी, सामान्य लोक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांकडे शेतीमाल आहे, पण ग्राहकाचे पैसे बँकेत असूनही मिळत नसल्याने शेतकऱ्याला उत्पादन कमी भावात विकावे लागत आहे, असे नारायण राणे म्हणाले.

कोकणातील त्यातच सिंधुदुर्गातील शेतकरी व जनता सहनशील आहेत, त्यामुळेच या बेबंदशाहीत गप्प आहेत. तुम्ही निवडून दिलेत आता भोगा, असा टोला नारायण राणे यांनी हाणला. नोटाबंदीचा फटका जिल्हा बँकांनाही बसला आहे, असे सांगत राणे म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर या प्रदर्शनाकडे फिरकले नाहीत. त्यांना जनतशी देणे-घेणे नाही. त्यांनी सहा महिन्यांत सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याचे जाहीर केले आहे. मी २५ वर्षांत दरडोई उत्पन्न लाखांत नेले ते सहा महिन्यांत दुप्पट म्हणजेच दोन लाख दरडोई उत्पन्न करणार आहेत, त्याबाबत त्यांनी संकल्पना सांगावी, असे आव्हानदेखील राणे यांनी केले.

जिल्ह्य़ाचा विकास कृषी, कृषी-उद्योग, दुग्धव्यवस्थापन, कुक्कुटपालनातून होऊ शकतो. शेतीपूरक व्यवसाय म्हणून याकडे पाहिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणारे हे कुटीर उद्योग आहेत, असे नारायण राणे म्हणाले.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, शेतकऱ्यांसाठी १२ टक्क्यांवरून ९ टक्के व्याजाने या प्रदर्शनात कर्ज देणार आहेत. शेती व शेतीपूरक व्यवसायाला चलन देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर तर स्वागत अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी आर. के. जोशी यांनी केले.