स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष सध्या आमदार फुटण्याच्या भीतीमुळे सत्तेसाठी लाचार झाला असल्याची, बोचरी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. ते रविवारी कणकवली येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. राज्यात भाजपविरोधी भूमिका घेत विरोधी पक्षात बसायचे आणि केंद्रात मात्र भाजपने दिलेले मंत्रिपदही सोडायचे नाही, अशी दुटप्पी भूमिका सेनेकडून घेतली जात आहे. शिवसेना पक्ष मराठी किंवा हिंदुंच्या भल्यासाठी नव्हे तर ‘मातोश्री’च्या उदरनिर्वाहासाठी चालवला जात असल्याचे सांगत नारायण राणेंनी शिवसेनेवर आगपाखड केली. याशिवाय, उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याची खिल्ली उडवताना राणेंनी हा दौरा म्हणजे ‘पर्यटन दौरा’ असल्याचे म्हटले. कोकणाच्या विकासाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने आजपर्यंत कोकणासाठी काय केले असा, सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला. शिवसेनेने कायमच कोकणात येणाऱ्या उद्योगांना विरोध केल्याचा आरोप राणेंनी केला.
तर दुसरीकडे, भाजप पक्ष महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असल्याचे राणेंनी सांगितले. अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी अर्थसंकल्प आणि दिवाळखोरीतील फरक समजवून घ्यायला हवा, असा उपहासात्मक सल्ला राणेंनी यावेळी दिला.