उद्धव ठाकरे बोलून गेले, ‘मी मुख्यमंत्री होणार’. पण त्यांना ते नीटपणे म्हणता आले नाही. मला तर त्यांचा आवाज बाईप्रमाणेच वाटला. जे म्हणायचे आहे, ते मोठय़ाने तरी म्हणा. दोन तास पक्षाचे काम करून काही होत नाही. ज्यांना सोयाबीन, कापूस, ऊस याची बियाणे माहीत नाहीत, असा माणूस मुख्यमंत्री कसा होईल, या शब्दात काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
 मराठवाडय़ातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. या वेळी खासदार अशोक चव्हाण, रजनी पाटील, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार सुरेश जेथलिया, भाऊ पाटील गोरेगावकर, कल्याण काळे यांची उपस्थिती होती.
राणे म्हणाले, ३९ वर्षे शिवसेनेत होतो. आमदारांना उद्धव ठाकरे भेटत नाहीत. कित्येकदा आलेला माणूस न भेटताच परतलेला पाहिला आहे, असे सांगत राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली. मराठवाडय़ातून २० पेक्षा अधिक काँग्रेसचे आमदार निवडून यावेत यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावेळी राज्याचे निवडणूक समन्वयक खासदार अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली. केवळ खांद्यावरील दस्ती बदलली म्हणजे माणसाचे कर्तृत्व बदलते काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपमध्ये जाणाऱ्यांना संघाचा गणवेश घालावा लागेल, असे सांगितले.
राणेंची पक्षनिष्ठा
प्रचार समितीतर्फे मराठवाडय़ातील पहिल्याच बैठकीला नारायण राणे कमालीचे वेळेवर आले. तेव्हा काँग्रेसच्या तंबूत मोजकेच कार्यकर्ते होते. अर्धा मंडप रिकामा होता. कार्यक्रमस्थळी समन्वयक अशोकरावही पोहोचले नव्हते. कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि व्यासपीठावर खासदार रजनीताई आणि चार माजी आमदार असेच चित्र काही वेळ होते. काही वेळाने अशोकराव आले. खुच्र्यावर कार्यकर्तेही बसले. याची दखल भाषणात घेत नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना सैन्याची शिस्त, कार्यकर्त्यांनी कसे वागावे याच्या सूचना केल्या. त्यांनी पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. ती दाखवावी लागते, असेही सुनावले. त्यांच्या या वक्तव्याची काँग्रेस कार्यकर्त्यांत ‘चांगलीच’ चर्चा रंगली.