पुढील हंगामाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात येईपर्यंत त्याचे घर चालण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत सरकारने द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनीच ही मागणी त्या वेळी केली होती. आता ती पूर्ण करण्याची संधी त्यांना देण्यासाठी आपण ही मागणी करीत असल्याचे राणे यांनी सांगितले.
मराठवाडय़ातील लातूर, उस्मानाबाद, बीड या दुष्काळी जिल्हय़ांच्या दौऱ्यावर राणे बुधवारी लातुरात दाखल झाले. लातूर तालुक्यातील चिंचोलीराववाडी, गंगापूर, पेठ या गावांना भेट देऊन, तेथील शिवाराची पाहणी करून ते बोलत होते. आमदार अमित देशमुख, त्र्यंबक भिसे, बसवराज पाटील, जि. प. अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, वैजनाथ िशदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख आदी उपस्थित होते. दुष्काळग्रस्त भागातील स्थिती अतिशय भयानक आहे. पाऊस नाही, त्यामुळे पिण्याला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. दुबार पेरणी करूनही वाया गेली. सरकार मदतीची घोषणा करते; पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ज्या विश्वासाने सरकारला निवडून दिले होते, तो सामान्य माणसाच्या मनातील विश्वास सरकारने गमावला असल्याचा आरोप राणे यांनी केला.
देशाचे पंतप्रधान १५ महिन्यांत २५ देशांना भेटी देतात. मॉरिशस, मालदीव या छोटय़ा देशांना भेटी दिल्या व तेथील पाण्याचा प्रश्न पाहून त्यांनी विमानाने पाणी देण्याचा निर्णय घेतला. मराठवाडय़ातील जनता ६ महिन्यांपासून टँकर सुरू करण्याची मागणी करीत आहे. त्यांना हंडाभर पाणीही मिळत नाही. जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय हे सरकारचे डोळे असतात. त्यांनी परिस्थिती सरकारच्या नजरेस आणून दिली पाहिजे. ते हे काम करणार नसतील, तर अशा कार्यालयाचा उपयोग काय? ही कार्यालये थेट मंत्रालयात घेऊन जा. यापुढे सामान्य माणसांचे प्रश्न सुटणार नसतील तर ही कार्यालयेच बंद पाडू, असा इशाराही राणे यांनी दिला.
मुख्यमंत्री सप्टेंबरमध्ये मराठवाडय़ात दुष्काळासंबंधी बठक घेणार असल्याची घोषणा करतात. तोपर्यंत येथील माणसे व गुरेढोरे मरून जातील, त्याचे काय? असा प्रश्न करून, पालकमंत्री फिरकत नाहीत. मुख्यमंत्री दर आठवडय़ाला नागपूरला जातात. मराठवाडय़ाच्या जनतेला या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आपण येथील जनतेच्या पाठीशी असून सरकारला त्याच्या जबाबदारीपासून तसूभरही हलू देणार नाही. सर्व कामे सरकारला करण्यास भाग पाडू, त्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा राणे यांनी दिला.
‘काही तर अभाव असेल’!
प्रश्नांची उत्तरे आपण प्रदेशाध्यक्षांना साजेशी देत आहात असे सांगताच राणे यांनी, ‘काही तर अभाव असेल ना’ अशी प्रतिक्रिया दिली. लातूरला सोलापूरहून पाणी देण्याबाबत सोलापूरकरांच्या भूमिकेची पाठराखण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली, याबद्दल विचारले असता ‘आपण लातूरकरांना पाणी देण्यासाठी आवश्यक त्या सर्वाना समजावून सांगू.’ शिवाय माणुसकीच्या प्रश्नापुढे अन्य प्रश्न गौण ठरतात. त्यामुळे कोणाची पाठराखण करताच येत नाही,’ असे त्यांनी सांगितले.