सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नारायण राणे व नितेश राणे पितापुत्रांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीत जिल्ह्य़ातील तीन मतदारसंघांत २४ उमेदवार रिंगणात उभे होते. जिल्ह्य़ात सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली. कणकवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नितेश राणे आणि भाजपचे प्रमोद जठार यांच्यात लढत झाली. त्यात काँग्रेसचे बंडखोर आमदार विजय सावंत यांनी अपक्ष, तर सुभाष मयेकर (शिवसेना) रिंगणात होते. काँग्रेस व भाजपमध्ये लढत असून या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला यश मिळेल अशी चर्चा आहे.
कुडाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक रिंगणात उतरले. या दोघांत लढत होती. राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत रिंगणात आहेत. या ठिकाणी नारायण राणे राज्याचे नेतृत्व करत असल्याने मतदारसंघात तो एक प्रभाव आहे. त्यामुळे मतदारसंघातील लोकांनी त्याला प्रतिसाद दिला किंवा कसे याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी लढत ठरली आहे. या ठिकाणी शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याविरोधात भाजपचे राजन तेली, राष्ट्रवादीचे सुरेश दळवी, मनसेचे परशुराम उपरकर व काँग्रेस पक्षाचे बाळा गावडे यांनी लढत दिली. या निवडणुकीत दीपक केसरकर यांना पराभूत करण्यासाठी सारे एकत्र आले असल्याने या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नारायण राणे आणि दीपक केसरकर यांचे आरोप-प्रत्यारोप झडले नाहीत. मात्र या दोघाही उमेदवारांच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीत दुपापर्यंत चित्र स्पष्टपणे उघड होणार आहे.
या निवडणुकीत जिल्ह्य़ात तीन जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात असले तरी सावंतवाडी मतदारसंघात मनसे िरगणात आहेत. अन्य दोन मतदारसंघांत लढत महत्त्वाची आहे. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहत होईल अशी अपेक्षा आहे.