केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विकासपुरुष आहेत अशा शब्दात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीबाबत राणे यांनी गौरवोद्गार काढले. कुडाळ येथे मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे भूमिपूजन  करण्यात आले. व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

मी मुख्यमंत्री असताना गडकरी मंत्रिमंडळात होते. तेव्हापासून त्यांच्या कार्याचा आवाका माहीत आहे, असे राणे यांनी सांगितले. विकासाच्या मुद्दय़ावर पक्षीय राजकारण नको, असे आवाहन त्यांनी केले. कोकणच्या बंदरे व रस्तेविकासासाठी पुढील तीन वर्षांत एक लाख कोटींची गुंतवणूक करून पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्ग ज्ल्ह्य़िात पर्यावरणपूरक विमानतळ, रस्ते, बंदरे झाल्यावर जगातील पर्यटक या ठिकाणी येतील. गोव्यापेक्षा कोकणाला पर्यटनात मोठी संधी असून भूमिपुत्रांनी रोजगार निर्माण करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. सरकार कोकणच्या मागे खंबीरपणे उभे राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पर्यटनवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पर्यटनाला अधिक वाव मिळावा यासाठी  पंचतारांकित हॉटेल निर्मितीबरोबरच  विमानतळ विकासासाठी शासनाने प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गडकरी हे कार्यक्षम मंत्री आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. उद्धव यांनी राणे यांचा उल्लेख जुने सहकारी असा केला. राणे व उद्धव ठाकरे  १२ वर्षांनी एका व्यासपीठावर आले होते.