भाजप प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या राज्यातील कामकाजावर टीका करणारे काँग्रेस नेते नारायण राणे मंगळवारी आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या पुणे येथे होणाऱ्या बैठकीच्या पूर्वसंध्येला राणे भूमिका जाहीर करणार असल्याने राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाबाबत आतापर्यंत टोलवाटोलवी केली होती. पण त्यांनी प्रथमच आपण २५ एप्रिलला भूमिका जाहीर करू, असे कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. नारायण राणे हे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी यादरम्यान कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली. पण राजकीय भाष्य करण्याचे टाळले होते. लातूर आणि राज्यातील अन्य निवडणुकांत काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचे खापर त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षांवर फोडले होते. राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी टोलवाटोलवी केली होती. भाजपची पुणे येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक २६ व २७ एप्रिलला होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर राणे आपली राजकीय भूमिका पूर्वसंध्येला जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय पक्का झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.