मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठींच्या उदासीन धोरणामुळे कोकणातील राणे समर्थकांना गळती लागल्याचे दिसून येत आहे.
राणे यांनी गेल्या २१ जुलै रोजी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी राणेंची चर्चाही झाली. तसेच गेल्या आठवडय़ात पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. त्यानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निमंत्रणाची वाट पाहत ते गेले दहा दिवस बसले आहेत. पण पक्षश्रेष्ठींकडून कसलीही सूचना आलेली नाही. उलट, मुख्यमंत्री चव्हाण यांनी  हा विषय माझ्या पातळीवर राहिलेला नाही, असे सांगून हात झटकले आहेत.
या सर्व अनिश्चित वातावरणामुळे कोकणातील राणे समर्थक कॉंग्रेसजन अतिशय अस्वस्थ असून पक्षश्रेष्ठी राणेंना किंमत देत नसल्याची त्यांची भावना झाली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे या संदर्भात स्वत:च्या राजकीय भविष्याचा तातडीने विचार करुन काही निर्णय न घेतल्यास दीर्घ काळ पश्चात्ताप होण्याची भितीही या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यातूनच काहीजणांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्याची जास्त शक्यता असलेल्या महायुतीच्या नेत्यांशी संपर्क साधायला सुरवात केली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी कदम, मनोहर रेडीज इत्यादी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राणेंचे डावे-उजवे हात समजले जाणारे आमदार राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते इत्यादी मंडळीही यापूर्वीच राणेंपासून हात राखून वागू लागली आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर येत्या ५ ऑगस्ट रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.