कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून प्रकरणातील तिन्ही आरोपींची नाकरे चाचणी होणार आहे. पोलीसच न्यायालयात ही मागणी करणार असून, त्यासाठी गुप्तचर खात्याचीही मदत घेण्यात येत आहे, असे समजते.

कोपर्डी येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. सर्वच स्तरावर या घटनेचा निषेध होऊन आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारच्या पातळीवर त्यादृष्टीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन कोपर्डी येथे ग्रामस्थांसमोर बोलताना व विधिमंडळातही दिले आहे. कठोर शिक्षेसाठीच या आरोपींची नाकरे चाचणी करण्याची मागणी होत आहे. पीडित कुटुंब व कोपर्डीच्या ग्रामस्थांनीही ही मागणी केली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनीही तयारी केली असून, न्यायालयाकडून त्यासाठी मान्यता मिळवण्याचा प्रयत्न आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गुन्हय़ाबाबत अजूनही पोलिसांना फारशी माहिती देत नसल्याचे समजते. या घटनेमागचे नेमके कारण, सहभाग नक्की किती जणांचा आहे आदी अनेक गोष्टींची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच पोलिसांना आरोपींची नाकरे चाचणी गरजेची वाटते. न्यायालयात याबाबत आरोपीचेही मत घेतले जाते. दरम्यान, तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केलेल्या तिन्ही आरोपींना अखेर सोमवारी रात्री घटनास्थळी नेऊन गुन्हा कसा घडला, याची पडताळणी करण्यात आली. याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. गावातील तणावाचे वातावरण लक्षात घेऊन या घटनेचे तपासी अधिकारी व सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कौशल्याने ही प्रकिया पार पाडली. या गुन्हय़ातील आरोपींना अटक करून काही दिवस झाले तरी पुढील तपासासाठी त्यांना घटनास्थळी नेता येत नव्हते. या घटनेचे पडसाद राज्यभर तीव्रतेने उमटले.