पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर दिवसांत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ‘बुरे दिन’ आल्याची टीका करीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दोन्ही काँग्रेसची आघाडी तुटल्याबद्दल पवार यांनी थेट कोणतेही भाष्य केले नाही. तसेच राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला लक्ष्य करीत असताना पवार यांनी मात्र सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री मुक्काम करुन पवार यांनी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे जेवण घेतले. आघाडी तुटल्यानंतर प्रथमच मराठवाडय़ात दाखल झालेले पवार जालन्याचा दौरा आटोपून येथे दाखल झाले. पंडित यांच्या ‘शिवछत्र’वर रात्रभर राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर त्यांनी रणनिती आखली. आमदार धनंजय मुंडे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केल्यानंतर आमदार बदामराव पंडित व आमदार अमरसिंह पंडित यांच्याशी एकत्रित संवाद साधला. माजलगाव मतदारसंघातील अशोक डक, मोहन जगताप, सहाल चाउस, अ‍ॅड. एकनाथ आवाड यांच्याशी चर्चा करुन आमदार सोळंके यांच्याविरुध्दची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. केजमधील स्थितीबाबत अक्षय मुंदडा व आमदार पृथ्वीराज साठे यांना एकत्र बसवून चर्चा केली. रात्री आमदार प्रकाश सोळंके व मंत्री सुरेश धस यांनीही भेट घेतली.
प्रमुख कार्यकर्त्यांशी पवारांनी थेट संवाद साधून निवडणुकीची रणनिती आखली. शनिवारी सकाळी माजलगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचाराचा प्रारंभ केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री क्षीरसागर यांनी दोन्ही काँग्रेसची आघाडी तुटून स्वतंत्र लढत असलो, तरी निवडणुकीनंतर सत्ता समीकरणांसाठी पवार कोणताही निर्णय घेऊ शकतात, असे सूचक विधान केले. पवार यांनी मात्र आघाडी तुटल्याबद्दल कोणतेही भाष्य न करता थेट पंतप्रधान मोदी यांच्या शंभर दिवसांतील कारभारावर टीका केली. राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्यासह सर्वच नेते आघाडी तोडल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य करीत असताना पवार यांनी मात्र सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.