कराड दक्षिणची निवडणूक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेमुळे आणखी टोकदार होईल असे मानले जात असतानाच अखेर मोदींची सभा रद्द झाली. परिणामी भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थक कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली असून, भाजपच्या गोटात संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान, मोदींच्या सभास्थळी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आता, उद्या सोमवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता खासदार राजीव प्रताप रूडी, मनोहर पर्रीकर व विनोद तावडे या भाजप नेत्यांची जाहीर सभा होणार आहे.
मोदींची सभा रद्द झाल्याने डॉ. अतुल भोसलेंचा गटात खळबळ आहे. मोदींची सभाच होणार नव्हती अशी चर्चा भाजपच्या एका गटाकडून होत होती. मोदींच्या सभेसाठी डॉ. भोसले यांनी आटोकाट प्रयत्न केले. पण, भोसले दलबदलू असल्याने त्यांना उमेदवारीच देऊ नये, अशी पक्षाकडे अटकळ घालणाऱ्या स्थानिक भाजप नेत्यांकडूनच मोदींची कराडवारी रद्द करण्याची कुरापत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडच्या कर्मभूमीत नरेंद्र मोदी काय बोलणार? नेमकी काय टोलेबाजी होईल? गर्दीचा आकडा काय राहील? सभेची फलश्रुती काय राहील? अशा चर्चाबरोबरच एकंदरच मोदींच्या दौऱ्याबाबतची उत्कंठता येथे दिसून येत होती. प्रचाराच्या सांगतादिनी मोदींची सभा होणार असल्याने  कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पंतप्रधानांची जोरदार टोलेबाजी होईल, असे गृहीत धरून राजकीय चर्चा चांगलीच रंगत राहिली. पण, मोदींची सभा होईल का? अशीही चर्चा अगदी सुरुवातीपासून होत होती. अखेर मोदींची सभा रद्द झाली अन् डॉ. भोसलेंच्या पदरी निराशा आली.
विशेष म्हणजे मोदी येणार नसले तरी त्यांच्या सभेच्या पार्श्र्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी मात्र पूर्ण झाली आहे. सभास्थळावरील भव्य मंडपाचेही काम पूर्णत्वाकडे असून, तेथे उद्या रूडी, पर्रीकर व तावडेंच्या जंगी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अखेरच्या टप्प्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, आता स्टार प्रचारक व सिनेअभिनेत्यांनाही प्रचारासाठी पाचारण करण्यात आले आहे. परिणामी राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघताना ऑक्टोबर हीटमध्ये राजकारणाचा पाराही चढा राहिला आहे. शिवसेनेचे उमेदवार डॉ. अजिंक्य पाटील यांच्यासाठी उद्या सोमवारीच आदित्य ठाकरे यांची भव्य पदयात्रा व सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.