देशाला सामर्थ्यवान नेतृत्वाची गरज असून हे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या रूपाने मिळणार असल्याची खात्री अवघ्या देशवासीयांना पटल्यामुळेच परिवर्तन अटळ आहे. त्यामुळे सोलापुरात काँग्रेसचे बलाढय़ उमेदवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव होऊन आपलाच विजय निश्चित होणार असल्याचा दावा भाजपचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी केला.
मंगळवारी सायंकाळी प्रचाराची सांगता झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. बनसोडे यांनी नरेंद्र मोदींच्या नावाची जादू काय आहे, हे प्रत्यक्ष मतपेटीतूनच दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, मोदी पंतप्रधान झाले, तर भ्रष्टाचार दूर होऊन देशाची अंतर्गत सुरक्षा, आर्थिक स्थिती सुधारू शकते. महागाईवर लगाम घालता येणे शक्य आहे. मोदी हे पंतप्रधान होणार असल्याची धास्ती इतर राष्ट्रांनी घेतली, यातूनच त्यांच्या कणखर व खंबीर नेतृत्वाची पावती मिळते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेची चाहूल लागल्यामुळे काँग्रेसवाल्यांनी साम, दाम, दंड नीतीचा वापर केला. सोलापुरात धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीनेच लढाई होत असून यात महायुतीच्या बाजूने सामान्य जनता ठामपणे उभी आहे. जनता पैसा स्वीकारत नाही, उलट भ्रष्टाचाराच्या विरोधात जनता उघडपणे बोलू लागते, तेव्हा महायुतीचा विजय दृष्टिपेक्षास दिसतो, अशा शब्दात अ‍ॅड. बनसोडे यांनी आपल्या विजयाबद्दल आत्मविश्वास बाळगला.