छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनरहस्यापासून ते रिचर्डस्च्या कलामीमांसेपर्यंत ज्यांचे अभ्यासक्षेत्र विस्तारले होते, ते थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा वैचारिक वारसा जतन करण्याचे प्रयत्न येथील ‘नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’तर्फे केले जात आहेत. नरहर कुरुंदकर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून एका अर्थाने गोदातटी हा विचारांचा जागरच सुरू आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
विचार का करायचा आणि कसा करायचा हे कुरुंदकरांनी अवघ्या महाराष्ट्राला शिकवले. विवेक आणि तर्कबुद्धीद्वारे त्यांनी केलेले अनेक विषयांचे ‘आकलन’ ही मराठीचे विचारविश्व रुंदावणारी ‘पायवाट’ ठरली. त्यांच्या विचारांचा कृतीशील ‘मागोवा’ विविध उपक्रमांच्या माध्यमातून या अभ्यास व संशोधन केंद्राद्वारे घेतला जात आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने या केंद्रास मान्यता दिलेली आहे.
कुरुंदकरांचे स्मारक व्हावे यासाठी ‘नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात आले. २०१० साली ‘नरहर कुरुंदकर प्रगत अभ्यास व संशोधन केंद्रा’च्या कामाला सुरुवात झाली. मुख्य अडचण होती जागेची. नांदेड एज्युकेशन सोसायटीने दीड एकर जागा उपलब्ध करून देत जागेचा प्रश्न मिटवला. चार वर्षांपूर्वी स्मारकाच्या जागेचे भूमिपूजन झाले. पण अजूनही कामाला प्रारंभ झाला  नाही. आता तर दोन कोटींच्या कामाचे अंदाजपत्रक आठ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. सर्जनशील कार्यकर्त्यांपासून ते समाजाचे वैचारिक नेतृत्व करणाऱ्या धुरिणांपर्यंत सर्वानाच मार्गदर्शक ठरेल असा दीपस्तंभ या स्मारकाच्या रुपाने गोदातटी साकारत आहे. समाजाला उन्नत करणारे संशोधन या ठिकाणी होईल, असा विश्वास संस्थेला भेट देणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

अभ्यासकांना दिली जाणारी शिष्यवृत्ती, आंतरविद्याशाखीय संशोधनाला देण्यात आलेले महत्त्व, विविध विषयांवरील चर्चासत्रे, व्याख्याने अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांनी आज हे अध्ययन केंद्राचे काम सुरू आहे.