धावत्या रिक्षातील महिलेचे मंगळसूत्र खेचले

सोनसाखळी चोरटय़ांना अधूनमधून पकडले जात असले तरी या घटना काही केल्या नियंत्रणात येत नसल्याचे दिसते. अलीकडेच पोलिसांनी तीन चोरटय़ांना अटक करत त्यांच्याकडून १६ तोळे सोने जप्त केले होते. ही कारवाई ताजी असतानाच गंगापूर, उपनगर व अंबड येथे झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांची मंगळसूत्रे चोरटय़ांनी लंपास केली. गंभीर बाब म्हणजे चालत्या वाहनातून सोनसाखळी ओढून नेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे.

सोनसाखळी चोरीची पहिली घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. माणिकनगरच्या श्रमिक सोसायटीत राहणाऱ्या शोभा सुभाष रकिबे काही कामानिमित्त डॉन बास्को शाळेसमोरून पायी जात होत्या. त्या वेळी एका निळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या संशयितांनी काही कळायच्या आत गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयाजवळ घडली. रत्नमाला भोसले घरी परतण्यासाठी रिक्षात जात असताना बिटको महाविद्यालयाजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन संशयितांनी रिक्षाजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओढून पळ काढला. पोलिसांनी नाकाबंदी करत संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाहीत. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना रोखण्यात पोलिसांना अपयश

तिसरी घटना सिडकोतील गणेश चौक भागात घडली. अरुणा सांब काही कामानिमित्त रस्त्याने पायी जात होत्या. महेश भवनसमोर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटय़ांनी सांब यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तीन सोनसाखळी चोरांना जेरबंद करत १६ तोळे सोने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली होती. अधूनमधून चोरटे हाती लागतात, मात्र या घटना पूर्णपणे रोखणे शक्य झालेले नाही. लागोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे पुन्हा एकदा ही बाब स्पष्ट झाली आहे.