पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम असला तरी मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना.. मनसे जिल्ह्य़ात निष्प्रभ.. जिल्ह्य़ातील मतदारांना राज्यात आणि आपल्या मतदारसंघात हवे परिवर्तन.. असे निष्कर्ष येथील हंप्राठा कला व रायक्ष विज्ञान महाविद्यालयातील जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघात केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहेत.
या बाबतची माहिती विभागप्रमुख प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे यांनी दिली. सर्वेक्षणात १५५५ मतदारांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व थरांतील मतदारांचा समावेश करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या कारभाराविषयी ७१ टक्के मतदारांनी समाधान व्यक्त केले तर मोदी लाट कायम असल्याचे ५१ टक्के मतदारांनी नोंदविलेले आहे. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराविषयी ६५ टक्के मतदारांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना २७ टक्के मतदारांची तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने २२ टक्के मतदारांनी कौल दिला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १८ टक्के, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १० टक्के मतदारांनी पसंती दिली. जिल्ह्य़ातील विद्यमान आमदारांच्या कामगिरीविषयी ५० टक्के मतदारांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराविषयी ५१ टक्के  मतदार नाराज आहेत.मराठा आणि मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचा काँग्रेस व राष्ट्रवादीला फायदा होईल अथवा होणार नाही असे म्हणणारे जवळपास समान आहेत. विधानसभा निवडणुकीत ५२ टक्के मतदार स्थानिक मुद्दे लक्षात घेऊन तर ३९ टक्के मतदार राज्याचा मुद्दा विचारात घेऊन मतदान करणार असल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न झाल्याचे भार्गवे यांनी सांगितले.