तर शिवसेनेच्या पारडय़ात २५.८० टक्के मते; भाजपच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ

महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला ३२.६६ टक्के मते मिळाली असून त्या खालोखाल २५.८० टक्के मते शिवसेनेला मिळाली आहेत. अपक्ष व इतरांनी १३.९४ टक्के मते हस्तगत करत काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा व माकप या राष्ट्रीयकृत पक्षांनाही मागे टाकले आहे. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची बिकट अवस्था झाली. त्यांना अनुक्रमे ४.७३ व ६.२९ टक्के मते मिळाली.

महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने मनसे आणि शिवसेनेला धक्का देत सर्वाधिक म्हणजे ६६ जागांवर विजय प्राप्त करत एकहाती सत्ता प्राप्त केली. शिवसेनेला ३५, महापालिकेतील सत्ताधारी मनसेला अवघ्या पाच, काँग्रेसला व राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा, रिपाइं एक आणि अपक्षांना तीन जागांवर विजय मिळाला. सत्तेचे समीकरण सहजपणे सोडविण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपने सर्वाधिक मते मिळविली. ३१ प्रभागात एकूण १२२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला आठ लाख ५३ हजार ३५८ मते मिळाली. ही टक्केवारी एकूण मतदानाच्या ३२.६६ टक्के इतकी आहे. गतवेळच्या तुलनेत भाजपच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या शिवसेनेला सहा लाख ७४ हजार १५२ मते मिळाली. ही टक्केवारी २५.६६ टक्के इतकी आहे. एबी फॉर्मच्या गोंधळामुळे दहा प्रभागात सेनेला पुरस्कृत उमेदवार उभे करावे लागले. संबंधित उमेदवारांचे मतदान अपक्ष म्हणून गृहीत धरण्यात आले. त्यामुळे सेनेच्या मतांच्या टक्केवारीत काहीशी घट झाली. पालिकेत सत्ताधारी राहिलेल्या मनसेला दोन लाख ६१ हजार ६६२ मते मिळाली. ही टक्केवारी १०.०१ आहे. राष्ट्रीयकृत पक्ष असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीला महापालिकेत अस्तित्वाची लढाई लढावी लागली. या दोन्ही पक्षांना केवळ सहा जागा पदरात पडल्या. राष्ट्रवादीला एक लाख ६४ हजार २६३ तर काँग्रेसला एक लाख २३ हजार ५५७ मते मिळाली. रिपाइं (आठवले गट) निवडणुकीत एक जागा मिळाली. या पक्षाला मिळालेल्या मतांची संख्या १७ हजार ५५४ आहे. बसपाला एकही जागा मिळाली नाही. त्यांना ५५ हजार ८७० मते तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला २२ हजार ३७ मते मिळाली. निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांची संख्या तब्बल पावणे तीनशेच्या घरात होती. त्यांनी राजकीय पक्षांपेक्षा अधिक मते मिळवली. अपक्ष व इतरांना तीन लाख ६४ हजार ३३५ मते मिळाली. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी १३.९४ आहे.

‘नोटा’ला २.९२ टक्के पसंती

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभागनिहाय मतपत्रिकेवरील एकही उमेदवार पसंत नाही हा पर्याय २.९२ टक्के मतदारांनी निवडला. ७६ हजार २७० मते या पर्यायाला मिळाली.