भुसावळहुन मुंबईला जाणाऱ्या सुपरफास्ट दुरांतो एक्सप्रेस गाडीच्या रेल्वे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी मनमाडजवळ लोहमार्गावरच थांबल्याने सोमवारी ऐन गर्दीच्या वेळी मनमाड ते नाशिक दरम्यान रेल्वे मार्गावरील वाहतुक सुमारे अडीच ते तीन तास ठप्प झाली. दुपारी बारानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र यामुळे अनेक जवळील आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर झाला. नाशिकहून मनमाडकडे येणाऱ्या प्रवासी गाड्यानांही त्यामुळे विलंब झाला.

सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हावडा-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मनमाड स्थानकातून रवाना झाली. मनमाड स्थानक सोडल्यानंतर या गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या गाडीच्या मागून नाशिकला जाणाऱ्या अनेक गाड्या लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या. इंजिनच्या दुरुस्तीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नादुरुस्त इंजिनसमोर दुसरे अतिरिक्त इंजिन जोडून दुरांतो मार्गस्थ केली.

तांत्रिक बिघाडामुळे मनमाड-कुर्ला-गोदावरी एक्सप्रेससह इतर गाड्यांना उशीर झाल्याने प्रवासी संतप्त झाले होते. तब्बल साडेचार तासांनतर ही वाहतूक अखेर पूर्ववत झाली.