नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज विविध ठिकाणाहून मतदान साहित्य मतदान केंद्रांवर नेण्यात आले. महापालिकेच्या १२२ जागांकरिता उद्या (दि.२१) मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या दरम्यान मतदान करता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांचे एकूण ८२१ उमेदवार आणि २७५ अपक्ष उमेदवार उद्या आपले भविष्य आजमावणार आहे. या एकूण १०९६ उमेदवारांपैकी कोणत्या १२२ उमेदवारांना नगरसेवक पदाची खुर्ची मिळणार हे २३ तारखेला निवडणुकीच्या निकालात समजणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभा झाल्या.

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, विकासाच्या गप्पा, आम्ही निवडून आलो तर हे करू ते करू अशा अनेक बाबींमुळे नाशिकमध्ये रंगलेल्या धुळवडीने नाशिकचे राजकीय वातावरण रंगून गेले होते. हे विविध पक्षातील उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी काल सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. या राजकीय तोफा रविवारी शांत झाल्यानंतर प्रशासनाचे कामही एकीकडे सुरु होते. निवडणुकीसाठी महापालिका, पोलीस आयुक्तालय, निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि विविध कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मतदान केंद्रावरील तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या होणाऱ्या निवडणुकीकडे नाशिककरांसह उमेदवारांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीसाठी १४०७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली. नाशिक शहरातील १० लाख ७३ हजार मतदार मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत. या मतदान केंद्रापैकी संवेदनशील २७९, अतिसंवेदनशील ८६ तर क्रिटीकल ७७ मतदान केंद्रे आहेत.

जिल्हा परिषद निवडणूक

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७३ गटांसाठी ३३८ उमेदवार आणि पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ६७६ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी २६५३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यातील २५३ केंद्रे संवेदनशील तर १५ केंद्रे क्रिटीकल मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हयाभरातून एकूण २४ लाख मतदार मतदान करतील. आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदान केंद्रांवर साहित्य पाठवण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी १७ हजार २०० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या दोन्ही निवडणुकांसाठी जिल्ह्यात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक महानगर पालिका निवडणुकीसाठी साडे चार हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी साडे तीन हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.