वारंवार निर्देश देऊन सुध्दा चळवळीतील महिला सहकाऱ्यांच्या लैंगिक छळात वाढ होत असल्यामुळे संतापलेल्या नक्षलवाद्यांनी अशाच एका प्रकरणात दोषी आढळून आलेल्या एका कमांडरला गोळ्या घालून ठार केल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीच्या अहवालात हा घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे.
मध्य भारतातील अनेक राज्यात सक्रीय असलेल्या या चळवळीत महिलांचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, याचा गर्वाने उल्लेख करणारी ही चळवळ आता महिलांच्या वाढत्या शोषणावरून वारंवार अडचणीत सापडू लागली आहे. माओच्या विचारात स्त्री-पुरुष, असा भेदाभेद नाही, असे सांगत सर्व सहकाऱ्यांना एकत्रित राहा, असे आदेश देत आलेली ही चळवळ आता याच मुद्यावरून वारंवार कोंडीत सापडू लागली आहे. या चळवळीच्या दंडकारण्य झोन समितीत दक्षिण गडचिरोलीचा समावेश आहे. या समितीच्या अखत्यारीत काम करणाऱ्या राममूर्ती नावाच्या कमांडरला नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. हा कमांडर अनेक महिला सहकाऱ्यांचे लैंगिक शोषणात सहभागी होता. पहिल्यांदा ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला कंपनी एकमधून दोनमध्ये बदलण्यात आले. तेथेही त्याने तेच प्रकार सुरू ठेवले. अखेर हा आरोप ठेऊन त्याला विभागीय समितीसमोर हजर करण्यात आले.
यावेळी गुन्हा कबूल करण्याऐवजी त्याने चळवळीतून काढाल तर पोलिसांना जाऊन सारे काही सांगेन, अशी धमकी दिली. त्यामुळे संतापलेल्या नक्षलवाद्यांनी त्याला जनतेचे न्यायालय भरवून गोळ्या घातल्या. हा सारा घटनाक्रम नक्षलवाद्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केला आहे. या आधी गडचिरोलीत काम करणाऱ्या ऐतू नावाच्या जहाल नक्षलवाद्याला याच आरोपावरून पदावनत करण्यात आले होते. त्याचा संदर्भ या अहवालात देत नक्षलवाद्यांनी भविष्यात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा सर्व सहकाऱ्यांना दिला आहे. महिलांच्या छळाच्या आरोपावरून ठार मारणे, ही मोठीच शिक्षा असली तरी अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ही मोठी शिक्षा देण्याशिवाय पर्याय नव्हता, असे नक्षलवाद्यांनी या अहवालात म्हटले आहे. चळवळीत सक्रीय असलेल्या सदस्यांकडून असे प्रकार घडू नयेत, यासाठीच हा घटनाक्रम सार्वजनिक करण्यात येत असल्याचे नक्षलवाद्यांनी यात स्पष्टपणे नमूद केले आहे. एकूणच महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा या चळवळीसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.