गडचिरोलीतील चामोर्शी उपविभागातील प्रकार
स्वतंत्र दंडकारण्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नक्षल संघटनेत प्रचंड असंतोष खदखदत असून बुधवारी नक्षलवाद्यानेच सहकारी नक्षलवाद्याची हत्या केली. या घटनेतून नक्षलवादीच आपापसात भिडल्याचे चित्र गडचिरोलीच्या जंगलात बघायला मिळत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी नक्षलवाद्यांची नाळ चांगलीच आवळली असून, त्यांना डोके वर काढणेही कठीण झाले आहे. परिणामत: नक्षल चळवळीतील नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष व अस्वस्थता खदखदत आहे. मोठय़ा नेत्यांमध्ये खदखदणारा हा असंतोष खालपर्यंत पोहोचला आहे. बुधवारी पहाटे तर नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या संघर्षांत एका नक्षलवाद्याने त्याचा सहकारी उपविभाग चामोर्शी अंतर्गत मौजा पुसेर येथे राहणारा नक्षल सदस्य किरण उर्फ कमकलाल निरंगू झरी (४५) याला ठार केले. किरण हा पूर्वी पोटेगाव नक्षल सदस्य होता. त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेक गुन्ह्य़ांमध्ये सहभाग होता. त्याच्यावर चामोर्शी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. हत्या, खून, बेकायदेशीर हत्यारे, तसेच स्फोटके जवळ बाळगणे या गुन्ह्य़ांमध्ये त्याला अटकही करण्यात आली होती, परंतु सध्या त्याची जामिनावर सुटका झाली होती.
यानंतर तो गावातच शेती व मोलमजुरी करत होता. किरण हा आपले घरदार, परिवार सोडून नक्षल चळवळीवर विश्वास ठेवून नक्षल दलममध्ये सहभागी झाला होता. आरोपींविरुध्द चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या भागात नाकाबंदी लावण्यात आली असून नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.