नक्षलवाद्यांचे विशेष कृती दलम सक्रीय

नक्षलवाद्यांच्या विशेष कृती दलमने पोलिसांना एकटे गाठून त्याची हत्या करायची आणि शस्त्रे पळवून नेण्याची नवीन व्युहरचना तयार केली आहे. गेल्या दोन महिन्यातील काही घटनांवरून हा डावपेच लक्षात आला असून हेडरी येथे दीपक मुकूंद सडमेक व छल्लेवाडा येथे नानाजी नागोसे यांची हत्या अशाच प्रकारे केली आहे.

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलिसांनी भरीव कामगिरी केल्याने नक्षलवाद्यांनी माघार घेतली आहे. आत्मसमर्पण योजनेत गडचिरोली पोलिस दलाला मोठे यश मिळाले असून कमांडरपासून तर दलम सदस्यापर्यंत आजवर सुमारे १०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले  आहे. गुप्त माहितीच्या आधारे नक्षलवाद्यांचे शिबीर उद्ध्वस्त करून अनेक मोठय़ा नक्षलींना ठार केले आहे. सेवारीच्या जंगलात तर पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना ठार करतांनाच पाच जणांना जखमी केल्याने नक्षलवादी संघटनेत कमालीची अस्वस्थता आहे. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी विशेष कृती दलमच्या माध्यमातून पोलिसांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. ११ मार्चला हेडरी येथे दीपक मुकूंद सडमेक या पोलिस शिपायाचीही याच प्रकारे हत्या करण्यात आली होती. हेडरी येथे आठवडी बाजार सुरू असतांना दीपक तेथेच तैनात होता. तेव्हाही पाच ते सहा साध्या वेशातील नक्षलवाद्यांनी अवघ्या काही मिनिटात दीपकवर गोळ्या झाडून त्याची बंदूक घेऊन पळ काढला होता. छल्लेवाडा येथेही माजी आमदार दीपक आत्राम यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सभा सुरू असतांना त्यांचे अंगक्षक पोलिस शिपाई नानाजी नागोसे जिल्हा परिषद शाळेच्या आडोशाला लघुशंकेसाठी जात असतांनाच साध्या वेशातील सहा-सात नक्षलवाद्यांनी घेरून त्यांना गोळ्या घालून ठार केले.

विशेष म्हणजे, अशी घटना होणार असल्याची माहिती गावकऱ्यांना होती. किंबहुना, डॉ. आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमातच साध्या वेशातील नक्षलवादी बसून होते, अशीही माहिती पोलिसांकडे आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आता दलमची संयुक्त कारवाई करण्याऐवजी विशेष कृती दलमच्या माध्यमातून एकेका पोलिसाला गाठून ठार करणे सुरू केले आहे. त्यामुळेच पोलिसांनीही एकटेदुकटे कुठे जाऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

साध्या वेशातील नक्षलवादी सध्या गावागावात फिरत असून पोलिसांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे पोलिसांनीही सावध राहावे, असे ठणकावून नक्षलवाद्यांच्या या विशेष कृती दलमवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छल्लेवाडा घटनेमुळे नक्षल संघटनेत मतभेद

छल्लेवाडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमावरच भ्याड हल्ला केल्यामुळे नक्षलवादी नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. या दिवशी अशी घटना घडवून आणण्याचे आदेश कुणी दिले? यामुळे संघटनेचे भविष्यात मोठे नुकसान होणार आहे, यावरही संघटनेत अंतर्गत वाद सुरू झाला असल्याची माहिती आहे. छल्लेवाडाच्या घटनेने नक्षलवाद्यांचे अंतर्गत वर्तुळ मतभेदांनी चांगलेच हादरले आहे.