नक्षलवादी चळवळीवर नियंत्रण ठेवून असणाऱ्या माओवाद्यांच्या केंद्रीय समितीतील तब्बल सोळा जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. चळवळीप्रति निष्ठा, अनुभव, माओचा विचार, गनिमी युद्धात तरबेज असे गुण असलेले नेतृत्व अलीकडच्या काळात तयार होत नसल्याने नक्षलवाद्यांवर ही वेळ ओढवली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
काही वर्षांपासून देशाच्या विविध भागांत वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून लढणाऱ्या नक्षलवाद्यांनी सप्टेंबर २००४ मध्ये एकत्र येत भाकप (माओवादी) हा पक्ष स्थापन करून चळवळीला गती दिली. तेव्हापासून या चळवळीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय समितीकडे देण्यात आली. या समितीचे नेतृत्व सध्या जहाल नक्षलवादी गणपती करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या समितीतील सोळा जागा रिक्त आहेत. दंडकारण्य भागात पीपल्स वॉर ग्रुप सक्रिय असताना नक्षलवाद्यांनी सर्वप्रथम अशा केंद्रीय समितीची संकल्पना अस्तित्वात आणली होती. तेव्हा या समितीत केवळ सात सदस्य होते. याच समितीला तेव्हा पॉलिट ब्युरोचा दर्जा बहाल करण्यात आला होता. नंतर सर्व गट व संघटनांच्या विलीनीकरणानंतर या केंद्रीय समितीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व गटांतील नेत्यांना समितीत सामावून घेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. तेव्हापासून या समितीतील सदस्यांची संख्या ३७ निश्चित करण्यात आली. गेल्या आठ वर्षांत प्रथमच या केंद्रीय समितीत आता केवळ २१ सदस्य शिल्लक राहिलेले आहेत. २००४ च्या विलीनीकरणासाठी नक्षलवाद्यांनी महासभेचे आयोजन केले होते. त्यानंतर २००७ ला पुन्हा अशीच महासभा घेण्यात आली. तेव्हा समितीतील सर्व जागा भरण्यात आल्या होत्या. ३७ सदस्यांच्या या केंद्रीय समितीतील सात ज्येष्ठ सदस्यांचा समावेश पॉलिट ब्युरोमध्ये करण्यात आला आहे. या ब्युरोला समितीतील रिक्त जागा भरण्याचे अधिकार आहेत. मात्र, अलीकडच्या काळात या समितीत स्थान मिळवू शकेल असे नेतृत्वच चळवळीच्या माध्यमातून तयार होत नसल्याने नक्षलवाद्यांनी या समितीत रिक्त जागा ठेवणेच पसंत केले आहे.
 दलम सदस्यापासून कामाला सुरुवात करून केंद्रीय समितीपर्यंत पोहचणारे अनेक जण या चळवळीत होऊन गेले. अलीकडच्या काळात मात्र अशी चमक दाखवणारे नेतृत्व तयार होत नसल्याची खंत या चळवळीचे अभ्यासक आता बोलून दाखवतात. गेल्या तीन वर्षांत किशनजी, आझाद यांसारखे अनेक जहाल नक्षलवादी मारले गेले. त्यांच्या जाण्यामुळे रिक्त झालेल्या जागासुद्धा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत.    

तरुणांची वानवा
गेली ३० वर्षांचा लढण्याचा अनुभव असलेल्या या नक्षलवादी चळवळीतील पहिल्या फळीचे नेते आता वृद्धत्वाकडे झुकले आहेत. काळाच्या ओघात या चळवळीत नव्याने दाखल झालेल्या नक्षलवाद्यांमधून दुसऱ्या फळीचे नेते तयार होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात असे नेतृत्वच तयार होत नसल्याने या चळवळीवर केंद्रीय समितीच्या जागा रिकाम्या ठेवण्याची वेळ आली आहे.