विकास आणि नक्षलवाद यांचा परस्पर संबंध नाही. नक्षलवाद ही जाणीवपूर्वक निर्माण केलेली समस्या आहे. ती मानसिक विकृती म्हणायला हवी. अर्थात आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ही समस्या आहे. परंतु या जिल्ह्यांमध्ये केवळ विकास केल्याने ही समस्या सुटणार नाही, असे मत केंद्रीय आदिवासी मंत्री जुएल उरांव यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे आदिवासी कोळी समाजाच्या मेळाव्यानिमित्त ते शहरात आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी या मंत्रालयाकडून कशाप्रकारे कारभार केला जाईल, याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
  नक्षलवादाचा व आदिवासी मंत्रालयाचा थेट संबंध नाही. मात्र आदिवासी भागात तो फोफावला आहे, याचा अर्थ अविकसित भागात तो फोफावतो असे नाही. विकासाच्या प्रक्रियेचा आणि नक्षलवादाचा तसा काही संबंध नाही. परदेशातील काही शक्ती नक्षलवाद वाढविण्यासाठी मदत करत असतात. अर्थात विकास करणे व आदिवासी बांधवाच्या हिताचे रक्षण करणे, ही जबाबदारी आहेच. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात असणाऱ्या आदिवासी व बिगर आदिवासी यांचा अभ्यास केला असता ३० टक्क्यांहून अधिक फरक आहे. तो कमी करण्यास प्राधान्य देण्याचे ठरविले असल्याचे उरांव यांनी सांगितले.
 उरांव पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र, त्यांचे स्वागत करण्यासाठी राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी नव्हता. आदिवासी व समाजकल्याण विभागाचे अधिकारी पुणे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागात अडकल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, राज्याची माहिती देण्यास कोणीच नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. माळीण येथे अधिकारी मदत व पुनर्वसनाच्या कार्यात अडकले असल्याने केंद्रीय मंत्र्यांना माहिती देण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हते, असे त्यांना सांगण्यात आले. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे हे विधान खरे आहे असे गृहीत धरून मी फारसे मनावर घेतले नाही. मात्र, असे वागणे बरे नव्हे, असेही ते म्हणाले. अर्थात या राज्य सरकारकडून फारशी अपेक्षा नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. या वेळी आदिम विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश कोळी यांची उपस्थिती होती.