शहीद सप्ताह सुरू, एटापल्ली परिसरात पत्रके, नोटाबंदीला तीव्र विरोध

नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाला आज, शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी एटापल्ली परिसरात सापडलेल्या पत्रकांमध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या नोटबंदीला तीव्र विरोध केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे नक्षलवाद्यांनी जंगलात लपवलेले कोटय़वधी रुपये आता मातीमोल झाले असून त्याचाच राग म्हणून त्यांचा नोटबंदीला तीव्र विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरवर्षी नक्षलवादी २ ते ८ डिसेंबरदरम्यान शहीद सप्ताह साजरा करतात. २ डिसेंबर १९९९ मध्ये पीपल्स वॉर ग्रुप या नक्षलवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचे  गल्ला आदीरेड्डी, सिलम नरेश व संतोष रेड्डी हे तीन नेते ठार झाले होते. या नेत्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ते शहीद सप्ताह  साजरा करतात. या सप्ताहात नक्षलवादी चळवळीत मोठय़ा संख्येने तरुणांची भरती करण्यात येते. मात्र, गेल्या पाच वर्षांंपासून ते मोठय़ा संख्येने आत्मसमर्पण करीत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक आदिवासी तरुण तर चळवळीपासून दुरावतच चालले आहेत. परिणामत: या जिल्ह्य़ात ही चळवळ संपल्यात जमा आहे. दरम्यान, ही वस्तुस्थिती असली तरी ते गनिमी काव्याने नक्षलवादी कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती आहे. या शहीद सप्ताहात कुठलाही घातपात होऊ नये, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करून लोकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नक्षलवादीही सरकारविरोधात पत्रकबाजी करत आहेत. गडचिरोलीत प्रथमच नक्षलवाद्यांनी या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नोटबंदीविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. एटापल्ली तालुक्यातील उडेरा-बुर्गी मार्गावर मिळालेल्या पत्रकात केंद्र व राज्यातील भाजप सरकार उखडून टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नोटबंदीचा निर्णय उद्योगपतींच्या फायद्याचा असून त्यामुळे सर्वसामान्य व गरीब जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या नावावर खोटय़ा गप्पा करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहेत, असा उल्लेख पत्रकात आहे.