कोकणातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हकालपट्टीची कारवाई केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच धोका निर्माण होऊ शकतो, असे चित्र आहे. येथील रायगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे निवडणूक लढवत असून या जागेसाठी येत्या गुरुवारी (२४ एप्रिल) मतदान होणार आहे, तर शेजारच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीतर्फे विद्यमान खासदार नीलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडणुकीला उभे राहिल्यामुळे रंगत निर्माण झाली आहे. चिपळूण शहर व तालुक्यात कदम यांचे समर्थक कार्यकत्रे मोठय़ा संख्येने आहेत. चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीतही त्यांचे पाठीराखे राष्ट्रवादीच्या चिन्हावर बहुसंख्येने निवडून आले आहेत. पण सध्या नगराध्यक्ष रिहाना बिजले यांच्यासह बहुतेक सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते पक्षाचे अधिकृत उमेदवार तटकरे यांच्याऐवजी कदम यांच्या प्रचारात उघडपणे गुंतलेले दिसून येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाने ही बाब गंभीरपणे घेऊन खरोखर कारवाई केल्यास संबंधित कार्यकर्त्यांच्या भवितव्यापेक्षाही चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आज असलेले स्थान धोक्यात येण्याचा जास्त संभव आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार नीलेश राणे यांना सुरुवातीपासून विरोध करत अखेरच्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या बाजूने प्रचार केला व मतदान घडवून आणले. पक्षाध्यक्ष पवार यांनी त्याबाबत वेळोवेळी स्पष्ट शब्दात तीव्र नापसंती व्यक्त केली असून जिल्हाध्यक्ष भिसे यांची पक्षातून हकालपट्टीही केली आहे. तसेच अन्य कार्यकर्त्यांबाबत येत्या २४ एप्रिल रोजी कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार खरोखर कारवाई झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसचा पायाच उखडला जाईल, अशी परिस्थिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही नीलेश राणे यांच्या प्रचारावर अघोषित बहिष्कार टाकला होता. निवडणुकीच्या काळात ते एकदाही या मतदारसंघात फिरकले नाहीत. निवडणुकीत खासदार नीलेश राणे यांचा पराभव झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सध्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठेवण्यात आपल्याला स्वारस्य राहणार नाही, असे वक्तव्य पवार यांनी केले आहे. पण जिल्ह्य़ातील आमदार केसरकर-भिसे समर्थकांवर कारवाई केल्यास प्रदेशाध्यक्षांनाही तोच न्याय लावणार का? असा प्रष्टद्धr(२२४)्ना या समर्थकांकडून विचारला जात आहे. तसे करणे पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे कारवाईची चर्चा हा केवळ निवडणूक काळातील स्टंट असू शकतो, असे मानले जात आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (नाशिक), सुनील तटकरे (रायगड), आनंद परांजपे (कल्याण-डोंबिवली), संजीव नाईक (नवी मुंबई-ठाणे), संजय दिना पाटील (मुंबई),  इत्यादी मोहरे काँग्रेस आघाडीतर्फे निवडणूक लढवत असून या सर्व जागांचे मतदान येत्या २४ एप्रिल रोजी आहे.
त्यावेळी मित्रपक्ष काँग्रेसकडून दगा-फटका होऊ नये म्हणून पवार स्वपक्षीय बंडखोरांवर कठोर कारवाईची भाषा सतत करत असावेत, असा अंदाज आहे. त्याबाबत राष्ट्रवादी पक्ष किती गंभीर आहे, हे या मतदानानंतरच स्पष्ट होईल.