सर्वपक्षीय विकास आघाडीचे आव्हान; अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला ; राज्य पातळीवरील नेते प्रचारात

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरक्षित मतदार संघ मानला जायचा. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांनी एकत्र येऊन बारामतीत नगरपरिषद निवडणुकीत बारामती विकास आघाडीच्या माघ्यमातून राष्ट्रवादीपुढे चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. या विकास आघाडीला भाजपचेही बळ मिळाले आहे. त्या शिवाय अपक्ष, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, मनसे, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी हेही नगरपरिषद निवडणुकीत त्यांचे बळ आजमावत आहेत.

पुणे जिल्ह्य़ातील दहापकी सहा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे घडय़ाळाच्या चिन्हावर लढवत आहे. पुणे जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेहमीप्रमाणे वर्चस्व राहील, असा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष जािलदर कामठे यांनी केला आहे. बारामतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे प्रचार सभा घेणार आहेत. तसेच बारामती विकास आघाडीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांची प्रचारसभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपने बारामती विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा एक नंबरचा राजकीय शत्रूपक्ष आहे. सध्या भाजपला चांगले दिवस आहेत. तेव्हा बारामतीत या वेळी परिवर्तन निश्चिपणे होणार असा दावा पालकमंत्री बापट यांनी केला आहे.

बारामतीत भाजपने अन्य काही जणांना बरोबर घेऊन विकास आघाडी केली आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपला पक्षाचा उमेदवार देता आलेला नाही. प्रत्यक्षात भाजपने उमेदवार दिला होता. मात्र आघाडीचा निर्णय झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार आघाडीतून देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. पवार आणि मोदी हे एकमेकांची स्तुती करतात. मात्र पक्षाच्या राजकारणात आम्ही एकमेकांचे कट्टर विरोधक आहोत, असेही भाजपकडून सांगितले जात आहे. बारामतीतील निवडणूक प्रचार अंतिम टप्यात आहे. निवडणुकीच्या मैदानात आजी-माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक उतरले आहेत. या निवडणुकीत गिरीश बापट आणि अजित पवार यांचा कस लागणार आहे. या दोघांपैकी कोण बाजी मारणार आणि कोण राजकीय स्थान पक्के करणार याचेही औत्सुक्य आहे. बारामती नगरपरिषदेच्या या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पसे खर्च करू शकणाऱ्यांना आणि धनशक्ती असणाऱ्यांना उमेदवार म्हणून संधी दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे मूळच्या निष्ठावंतांना संधी मिळू शकलेली नाही. अशा नाराज झालेल्यांची नाराजी दूर कशी करायची हाही मुद्या राजकीय पक्षांपुढे उभा आहे.

सर्वपक्षीय नेते विकास आघाडीत

बारामती विकास आघाडीत शरद पवार यांचे वर्गमित्र, माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि साखर व्यवसायातील तज्ज्ञ चंद्रराव तावरे, माजी नगराध्यक्ष रंजनकाका तावरे, विद्यमान नगरसेवक सुनील पोटे, भाजपचे बाळासाहेब गावडे, पुणे बाजार समितीचे दिलीप खैरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढवाण पाटील, विरोधी नगरसेवक सुनील सस्ते, भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रशांतनाना सातव, सतीश फाळके, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. मात्र आघाडीच्या माध्यमातून त्यांना एकच निवडणूक चिन्ह घेता आले नाही. या अडचणीला उमेदवार आणि कार्यकत्रे तोंड देत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुरा नगरसेवक सुभाष ढोले, किरण गुजर, नगराध्यक्ष योगेश जगताप, इम्तीयाज शिकिलकर, अमर धुमाळ, सीमा चव्हाण, वनिता बनकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राहुल वाबळे, करण इंगुले, अविनाश गायकवाड, किरण तावरे आदींवर आहे.

बारामती नगर परिषदेची ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या मुद्यावर लढवित आहे. बारामतीत मोठय़ा प्रमाणात विकासकामे झाली आहेत, हा राष्ट्रवादीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता दिल्यास विकासाला गती देता येते, असे अजित पवार यांच्याकडूनही सांगण्यात येत आहे.

बारामतीत ७५ हजार मतदार

बारामती नगरपरिषदेत ७५ हजार २७६ मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या ३८ हजार १८२ आहे, तर महिला मतदारांची संख्या ३७ हजार ९४ आहेत. बारामतीमधील १९ प्रभागांतून ३९ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे एकूण ४० जण निवडून येतील. बारामती नगरपरिषेचा अ वर्ग नगरपरिषदेत समावेश झाला आहे. पुणे जिल्ह्य़ातील सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून बारामती नगरीची ओळख आहे.

राजकीय आघाडीवर..

  • मुख्य लढत राष्ट्रवादी विरुद्ध बारामती विकास आघाडी
  • भाजपकडून विकास आघाडीची स्थापना
  • विकास आघाडीत सर्वपक्षीय नेते. इतरही सर्वपक्षांचे उमेदवार