आघाडीत काँग्रेसकडे असलेल्या परभणी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीनेही दावा केला असून तब्बल ११जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. १९९० पासून काँग्रेस परभणी मतदारसंघात पराभूत होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा, अशी या पक्षाची मागणी आहे.
या मतदारसंघात शिवसेनेने झेंडा रोवला, तो अजून कायम आहे. हनुमंत बोबडे, तुकाराम रेंगे व संजय जाधव यांनी या काळात परभणीचे प्रतिनिधित्व केले. सुरुवातीला आलेल्या सेनेच्या झंझावातात बोबडे आमदार झाले. त्यांच्यानंतर रेंगे यांनी दोन वेळा व विद्यमान खासदार संजय जाधव यांनीही दोन वेळा प्रतिनिधित्व केले. मतदारसंघ मुस्लिम बहुल असल्याने सेनेला विजय सोपा जातो, असा येथील इतिहास आहे.
काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्यानंतर शिवसेना जातीय प्रचार करून निवडून येते. त्यामुळे पक्षाने दुसरा उमेदवार द्यावा, असे काँग्रेस पक्षातील काही दावेदारांनी पक्षश्रेष्ठींसमोर सांगितले. वस्तुत या मतदारसंघात काँग्रेसने दोन्ही प्रयोग केले आहेत. शमीम अहमद खान व लियाकत अन्सारी यांना उमेदवारी दिल्यानंतरही ते पराभूत झाले, तर अशोक देशमुख, तुकाराम रेंगे यांनाही काँग्रेसमध्ये आल्यानंतर उमेदवारी दिली. मात्र, या दोघांचाही पराभव झाला. सेनेतून आलेल्या नेत्यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतरही ‘गद्दार विरुद्ध निष्ठावंत’ असा प्रचार केला जातो. आता ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
राष्ट्रवादीने परभणी मतदारसंघात इच्छुकांचे अर्जही भरून घेतले. तब्बल ११ जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार, महापौर प्रताप देशमुख, आमदार बाबाजानी दुर्राणी, बाळासाहेब जामकर, डॉ. प्रफुल्ल पाटील, उपमहापौर सज्जुलाला, सोनाली देशमुख, विष्णू नवले पाटील, अली खान, गंगाधर जवंजाळ, विशाल बुधवंत या इच्छुकांचा यात समावेश आहे. बाबाजानी सध्या विधान परिषद सदस्य आहेत.
दरम्यान, मराठवाडय़ातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी (दि. २६) मुंबईत पक्ष कार्यालयात होणार आहेत. काँग्रेस पक्षात इच्छुकांची रांग असताना राष्ट्रवादीतही इच्छुकांनी मोठय़ा संख्येने उमेदवारी मागितल्याचे चित्र आहे. काँग्रेसचा या मतदारसंघात सतत पराभव होत आहे. मात्र, मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.