कांद्याचे भाव कोसळल्यावर त्याचे राजकीय भांडवल करीत राष्ट्रवादीने नाशिक परिसरात भाजपची कोंडी केली आहे. हा प्रश्न चिघळल्यास भाजपला त्याचा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्यानेच अलीकडेच खात्याचा संबंध नसतानाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधितांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता.

कांद्याचा क्विंटलला पाच रुपये म्हणजेच किलोला ५ पैसे भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शेतकरी रस्त्यावर आले असून, निफाड, लासलगाव परिसरात सरकारच्या विरोधात संतप्त भावना पसरली आहे. याचा बरोबर फायदा राष्ट्रवादीने घेतला. दोन दिवस नाशिक जिलत तहसील कार्यालयांसमोर कांदाफेक आंदोलन राष्ट्रवादीने सुरू केले. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. कांद्याचा पीक चांगले येणार असल्याने दर कोसळणार याचा अंदाज बांधून नियोजन करणे आवश्यक होते, पण सरकारच्या पातळीवर तसे नियोजन न झाल्यानेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कांद्याचा मुद्दा वांदा करेल हे लक्षात आल्याने अलीकडेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत बैठक बोलाविली होती. रामविलास पासवान आणि राधेमोहन सिंग या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना गडकरी यांनी बैठकीला बोलाविले होते. या बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री राधेमोहन सिंग यांनी कांद्याच्या खरेदीवरून सारे खापर महाराष्ट्र सरकारवर फोडले होते.

छगन भुजबळ अटकेत असल्याने नाशिक जिल्त राष्ट्रवादीची बाजू लंगडी झाली होती. कांद्याचा भाव कोसळल्याने राष्ट्रवादीने संधीचा फायदा घेत राजकीय मुद्दा तापविला आहे. सरकारच्या पातळीवर निर्णय प्रक्रियेत एकवाक्यता नसल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येते. हा मुद्दा हाताळण्यावरून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपवर खापर फोडले आहे.

नाशिकमध्ये भाजपला चिंता

कांद्याच्या मुद्दय़ावर नाशिक जिलत भाजपला फटका बसू शकतो. नाशिक महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेत चांगल्या यशाची अपेक्षा असलेल्या भाजपपुढे कांद्यामुळे वांदा होणार आहे. कांद्याला किलोला पाच पैसे भाव मिळत असताना राज्य सरकार गप्प का, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. राज्याने कांदा खरेदीकरिता प्रस्तावच केंद्राला पाठविला नाही.कांद्याच्या खरेदीकरिता पुढाकार घेतला नाही, असा आरोपही मुंडे यांनी केला.