महाराष्ट्रात लोकसभेच्या बावीस जागा लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून आघाडी झाल्यास उत्तमच, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्यास पक्ष सक्षम असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी नागपुरात स्पष्ट केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यंदा नवे चेहरे दिसतील. महाराष्ट्रातील विद्यमान मंत्र्यांपैकी अनेकांना संधी दिली जाणार आहे. गोवा, गुजरात, बिहार (लालुप्रसाद, पासवान यांच्यासोबत आघाडी), मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर, उत्तर प्रदेश, अंदमान, लक्षद्वीप, केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा ते वीस जागांवर उमेदवार उभे करणार आहे.
सध्या ज्या गतीने सध्या सरकार निर्णय घेत आहे, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुंबईत सी-लिंकचे काम अर्धवट आहे. ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. सिंचन प्रकल्पांना सुधारित मंजुरी देण्यासही उशीर केला जात आहे. मुंबईत विमानतळबाधित २२ हजार झोपडपट्टीवासियांसाठी तीन वर्षांपासून घरे बांधून तयार आहेत. त्यांचे वाटपही अद्याप महाराष्ट्र सरकारला करता आलेले नाही. वेळेवर घेतलेल्या निर्णयाचा फायदाच असतो. वेळेवर निर्णय झालाच तर केवळ राष्ट्रवादीलाच फायदा मिळेल, असे नाही तर काँग्रेसलाही फायदा होईल, असे पटेल म्हणाले.
‘आप’ अल्पवयीनअसून त्यामुळे कुठल्याही वक्तव्याकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही. ‘आप’मुळे राष्ट्रवादी काय इतर कुठल्याही राजकीय पक्षाला फटका बसेल, असे वाटत नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बावीस जागी उमेदवार उभे करण्यावर ठाम आहे. त्यात कुठलीही तडजोड करणार नाही. तीन-चार जागांची फारतर अदलाबदल करू. एखादी जागा वाढवून घेऊ, पण कमी करणार नाही. जागा वाटपाचा हा फाम्र्युला तयार आहे. काँग्रेसची इच्छा असेल तर आघाडी होईल, अन्यथा स्वबळावर लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले.